Team India Victory : टी20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केलं. मुंबईत विश्वविजेत्या टीम इंडियाची (Team India) जंगी मिरवणूक काढण्यात आली.नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूक निघाली. त्यावेळी नरिमन पॉईंट परिसरात टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहत्यांचा जनसागर उसळला. मरिन ड्राईव्हचा अथांग समुद्रकिनारा आणि त्याच्या समोरच लाखो चाहत्यांचा जनसागर असं हे चित्र होतं. ओसंडून वाहणारा उत्साह, आसमंत भेदणारा जल्लोष असं हे सगळं वातावरण होतं. आपल्या लाडक्या वर्ल्ड चॅम्पियन्सना पाहायला ठिकठिकाणाहून चाहते आले होते. त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत जगज्जेत्यांची विजय रॅली दिमाखात निघाली. क्रिकेटच्या पंढरीत क्विन्स नेकलेसवरचं हे दृश्य अत्यंत मनमोहक असंच होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्या चार खेळाडूंचा सत्कार
वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंना राज्य सरकारकडून (Maharashtra Government) प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय. आज विधीमंडळात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह (Rohit Sharma) महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणारेय. त्यावेळी त्यांना बक्षीसही देण्यात येणारेय. आज दुपारी 4 वाजता विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय.


सत्कारावरुन आरोप-प्रत्यारोप
टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार विधीमंडळात होणारे. त्यापूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. विधान परिषदेमध्ये विरोधकांनी निमंत्रण नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर सभापती निलम गो-हे यांनी स्वत: या वादावर पडदा टाकण्यासाठी विरोधकांना निमंत्रण दिलं.


बस गुजरातवरुन का मागवली?
क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी गुजरातमधून मागवलेल्या बसवरून राऊतांनी टीका केलीय. सर्वकाही गुजरात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईत ओपन बस नसती तर बनवून घेतली असती इतकी मुंबईची क्षमता आहे अशी टीका राऊतांनी केलीय. तर खेळाडूंच्या सेलिब्रेशमुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झालाय असा पलटवार प्रताप सरनाईकांनी केलाय. तर क्रिकेटरच्या बसवर टीका करणारे काल रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते. अशी टीका नितेश राणेंनी रोहित पवारांवर केलीय. सकाळी टीका करायची आणि रात्री फोटोसाठी धावायचे हे डबल ढोलकी असल्याचं राणेंनी रोहित पवारांना म्हटलंय. तर राणेंची उंची छोटी असून, फडणवीसांना खूश करून मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र, आम्ही त्यांना पुढील 5 वर्षातही ते शक्य होऊ देणार नाही असा पलटवार रोहित पवारांनी केलाय.