बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट टीमसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.
मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट टीमसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. टी-२० साठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माकडे टी-२० टीमचं नेतृत्व करण्यात आलं आहे. संजू सॅमसनची टी-२० टीममध्ये निवड करण्यात आली आहे. सॅमसनने काहीच दिवसांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावलं होतं.
ऋषभ पंत हा विकेट कीपर आधीपासून टीममध्ये असल्यामुळे सॅमसनची निवड महत्त्वाची मानली जात आहे. विराट टीममध्ये नसल्यामुळे सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. सॅमसनबरोबरच शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांनाही संधी देण्यात आली आहे. ३ नोव्हेंबरपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ टी-२० आणि २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.
टेस्ट टीममध्ये विराट कोहली खेळणार आहे. तर कुलदीप यादवचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुखापत झाल्यामुळे कुलदीप यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला टेस्ट आणि टी-२० सीरिजमध्ये संधी मिळालेली नाही.
भारतीय टी-२० टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर
भारतीय टेस्ट टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत
बांगलादेश सीरिजचं वेळापत्रक
३ नोव्हेंबर- पहिली टी-२०- दिल्ली
७ नोव्हेंबर- दुसरी टी-२०- राजकोट
१० नोव्हेंबर- तिसरी टी-२०- नागपूर
१४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर- पहिली टेस्ट- इंदूर
२२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर- दुसरी टेस्ट- कोलकाता