टीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला... नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात
India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) नव्या वर्षाची दणक्यात सुरवात केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला (Team India defeat South Africa). सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी कसोटीचा निकाल लागला. पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांवर गडगडला. भारतासमोर विजयासाठी 79 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं.
भारतातर्फे जसप्रीत बुमराहने 14 षटकात 61 धावा देत सहा विकेट घेतल्या. तर मुकेश कुमारने दोन आणि मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांवर आटोपला होता. मोहम्मद सिराजने अवघ्या 15 धावात सहा विकेट घेण्याची कामगिरी केली होती. या विजयाबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
केपटाऊनमध्ये पहिला विजय
केपटाऊनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा हा पहिला विजय ठरला आहे. याआधी याच मैदानावर टीम इंडियाला सहा पैकी चार सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. दोन सामने अनिर्णित राहिले. 1992 पासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी खेळण्याचा इतिहास आहे. पण केपटाऊनमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता. हा दुष्काळ आता रोहित शर्माच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडियाने संपवला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही आशियाई संघाचा केपटाऊनमधला हा पहिला विजय ठरला आहे. 79 धावांच्या विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाने तीन विकेट गमावत विजय मिळवला.
दुसऱ्या जावात यशस्वी जयस्वलाने 28 धावा केल्या, यात त्याने सहा चौकार लगावले. तर कर्णधार रोहित शर्मा 17 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय विराट कोहली (12) आणि शुभमन गिल (10) धावांवर बाद झाले. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 176 धावांत गुंडाळला. बुमराहने सहा विकेट घेतल्या. एकीकडे दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज धडाधड बाद होत असताना दुसऱ्या बाजूला अॅडम मार्करमने झुंजार खेळी केली. मार्करमने तब्बल 106 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांवर आटोपल होता. मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. पण गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरलं. टीम इंडियाची पहिली इनिंग 153 धावांवर आटोपली. भारतीय संघाचे तब्बल सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले.