ICC ODI Ranking: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. मंगळवारी ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात 19 धावा देऊन 6 गडी बाद केले. या कामगिरीमुळे बुमराहने तीन स्थानांची झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा ट्रेंड बोल्ट आणि पाकिस्तानचा शाहिन अफ्रिदीला मागे टाकत प्रथम स्थान पटकावलं आहे. 718 गुणांसह जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. जसप्रीत बुमराह दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात जगातील नंबर-1 गोलंदाज ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तसेच बुमराहची 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बुमराह इंग्लंडमध्ये 6 विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. बुमराहने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, लियाम लिविंगस्टोन, डेविड विली आणि ब्रायडन कार्स या 6 जणांना माघारी पाठवलं. उल्लेखनीय बाब म्हणजे बुमराहने रॉय, रुट आणि लिविंगस्टोन या तिघांना शून्यावर आऊट केलं. 


 टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 111 धांवांचं आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.