IND vs SL ODI : टीम इंडियाचं `शतक` पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक
Sri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.
India vs Sri Lanka 3rd ODI : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर बुधवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाला 110 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकीसमोर टिकता आलं नाही. तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर आता टीम इंडियाने मालिका देखील 2-0 ने गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले आणि टीम इंडियाची नाचक्की झाली.
तब्बल 27 वर्षांनंतर भारताने श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गमावली होती. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 3-0 असा पराभव केला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 11 एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. त्यातील दोन एकदिवसीय मालिका श्रीलंकेने जिंकल्या आहेत.
टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं
भारत आणि श्रीलंका वनडेमध्ये तब्बल 170 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचं पारडं भारी राहिलंय. भारताने 99 सामन्यात विजय मिळवला असून आता विजयाचं शतक ठोकण्याची संधी यंदाच्या मालिकेत भारताकडे होती. मात्र, टीम इंडियाला मालिकेत एकही विजय मिळवता न आल्याने आता टीम इंडियाचं श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचं शतक हुकलंय.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.