विशाखापट्टणम : २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टेस्टसाठीच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये ऋद्धीमान सहा आणि आर.अश्विनचं पुनरागमन झालं आहे. या दोन्ही खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवडण्यात आलं होतं, पण त्यांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतला संधी मिळाली होती, पण तो फॉर्ममध्ये नसल्यामुळे सहाची निवड करण्यात आली, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे. तसंच कुलदीप यादव, शुभमन गिल आणि उमेश यादव यांनाही टीममध्ये जागा मिळाली नाही. जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी उमेश यादवची नंतर निवड करण्यात आली.


आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन स्पिनर सीरिजची सुरुवातीची मॅच खेळतील. जेव्हा टीमला दोन स्पिनरची गरज असेल तेव्हाच आम्ही दोघांना खेळवू, असं विराटने स्पष्ट केलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये अश्विनऐवजी जडेजाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली होती. 


टीम इंडिया


विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋद्धीमान सहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा


भारताने वेस्ट इंडिजचा २-०ने पराभव केल्यानंतर विराट कोहली परदेशातल्या मैदानात भारताचा यशस्वी कर्णधार झाला. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ४८ टेस्टपैकी २८ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. विराटने धोनीचा २७ विजयांचा विक्रम मोडीत काढला.