IND vs SA Test: सहा टेस्ट, सहा कर्णधार, Wanderers वर भारताचा अजब रेकॉर्ड
`किंग कोहली` सामन्यातून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाबाबत एक अजब रेकॉर्ड घडला आहे.
IND vs SA, Johannesburg Test : जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भारतीय संघ (Team India) विराट कोहलीशिवाय (Virat Kohli) मैदानात उतरला आहे. दुखापतीमुळे कोहली या सामन्यात खेळू शकला नाही. कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. 'किंग कोहली' सामन्यातून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाबाबत एक अजब रेकॉर्ड घडला आहे.
वास्तविक, भारतीय संघ जोहान्सबर्ग (Johannesburg Test) मध्ये सहावी कसोटी खेळत आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व वेगवेगळ्या कर्णधाराने केलं आहे.
१९९२ मध्ये पहिला कसोटी सामना
1992 मध्ये, मोहम्मद अझरुद्दीनच्या (Mohammad Azharuddin) नेतृत्वाखाली, भारताने वाँडरर्स मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला, जो अनिर्णित राहिला. यानंतर भारतीय संघ 1997 मध्ये याच मैदानावर आपला दुसरा कसोटी सामना खेळला आणि पुन्हा एकदा हा सामनाही अनिर्णित राहिला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारताची धुरा सांभाळली होती.
वाँडरर्सवर पहिला विजय
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतला तिसरा कसोटी सामना 2006 साली वाँडरर्स येथे खेळला गेला. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सामना 123 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय संघाचा हा पहिला कसोटी विजय ठरला. त्यानंतर 2013 मध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारताचा या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. पण हा सामना अनिर्णित राहिला.
यानंतर 2018 साली विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने इथं 63 धावांनी विजय मिळवला. आता 2021 मध्ये केएल राहुलने वाँडरर्समध्ये भारतीय संघाची कमान हाती घेतली आहे.
भारताची खराब सुरुवात
टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची पहिला डाव अवघ्या 202 धावांवर आटोपला. कर्णधार केएल राहुलने एकाकी झुंज देत अर्धशतक केलं. तर आर अश्विनने ४६ धावा भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
भारतीय कसोटी क्रिकेटचे हुकमी आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. पुजारा ३ धावांवर बाद झाला तर रहाणेला खातही खोलता आलं नाही.