वनडे सीरिजआधी भारतीय टीमनं गाळला घाम, धोनीही उतरला मैदानात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला.
डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. यानंतर आता १ फेब्रुवारीपासून वनडे सीरिज सुरु होणार आहे. या सीरिजआधी भारतीय टीमनं जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. डरबनच्या मैदानात महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल यांनी घाम गाळला.
भारतीय टीमच्या सरावाचा फोटो बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये धोनी, केदार जाधव आणि शिखर धवन सराव करताना दिसत आहेत. सीरिज सुरु होण्याआधी भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यरनं धोनीवर विश्वास दाखवला आहे. धोनी टीममध्ये आल्यामुळे टीम मजबूत झाली आहे. त्यामुळे आम्ही जोरदार पुनरागमन करू, असं श्रेयस अय्यर म्हणालाय.
भारताच्या वनडे टीममध्ये शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. चायनामन स्पिनर असलेला कुलदीप यादवनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुलदीपनं १४ वनडेमध्ये २२ विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये कुलदीपचा इकोनॉमी रेट ४.८८ एवढा आहे. तर शार्दुल ठाकूरला मात्र फारशी संधी मिळालेली नाही. शार्दुलनं सप्टेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रोहित, धवन, रहाणे, कोहली, जाधव आणि धोनीला बॅटिंगची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.