मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार स्पिनर हरभजन सिंहने (Harbhajan Singh) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. भज्जीने ट्विट करत क्रिकेटला रामराम ठोकत असल्याची माहिती दिली. हरभजनने सहकाऱ्यांचे, सपोर्ट स्टाफ आणि संबंधित सर्वांचे आभार मानले. (Team india senior off spinner Harbhajan Singh has announced his retirement from all formats International cricket)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भज्जीने ट्विटमध्ये काय म्हंटलंय? 


"सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट असतो.ज्या खेळाने मला आयुष्यात सर्व काही दिले आहे,  आज मी त्या खेळाचा निरोप घेतो आहे. ज्यांनी हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला, मी त्या प्रत्येकाचा आभारी आहे", असं ट्विट भज्जीने केलंय.


भज्जीची 23 वर्षांची कारकिर्द


भज्जीने 1998 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. यानंतर आता त्याने 23 वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतलाय. भज्जीने वयाच्या 17 वर्षात कसोटी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता भज्जी 41 वर्षांचा आहे. 


भज्जीची तिन्ही फॉर्मेटमधील आकडेवारी 


भज्जीने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भज्जीने टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 बळी घेतले. तर टी 20 फॉर्मेटमध्ये 25 जणांना त्याने माघारी पाठवलंय. 


गेल्या 5 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर


भज्जी टीम इंडियापासून गेल्या अनेक वर्षांपासून बाहेर होता. त्यामुळे तो लवकरच निवृत्ती घेणार असल्याची चर्चाही होती. दरम्यान त्याने आता निवृत्ती घेतल्याने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. 


भज्जी गेल्या 5-6 वर्षांपासून टीम इंडियापासून बाहेर होता. त्याने अखेरचा कसोटी सामना हा 2015 मध्ये श्रीलंके विरुद्ध खेळला होता. तर अखेरची वनडे मॅच 2015 दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळला होता. तर यूएई विरुद्ध 2016 मध्ये टी 20 मॅच खेळला होता.