टॉस पडण्याआधीच भारतीय टीमची यादी लीक
इंग्लंडविरुद्धची दुसरी टेस्ट मॅच पावसामुळे अजूनही सुरु झालेली नाही.
लंडन : इंग्लंडविरुद्धची दुसरी टेस्ट मॅच पावसामुळे अजूनही सुरु झालेली नाही. सकाळपासूनच पाऊस पडत असल्यामुळे या मॅचचा टॉसही पडलेला नाही. पण या मॅचमध्ये कोण खेळाडू खेळणार याची यादी आधीच लीक झाली आहे. ट्विटरवर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या नावांच्या यादीचा कागद व्हायरल झाला आहे. पण ही खरंच दुसऱ्या टेस्टसाठी खेळणारी टीम आहे का नाही याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. टॉस पडण्याच्या आधी दोन्ही टीमचे कर्णधार अंपायर आणि मॅच रेफ्रीकडे टीमची यादी देतात.
कोण आहे टीममध्ये?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा फक्त ३१ रननी पराभव झाला. विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये १४९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. पण विराटला कोणत्याही बॅट्समननं साथ न दिल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीममध्ये बदल होतील, असं बोललं जात होतं. पण लीक झालेली टीम खरंच मैदानात उतरणार असेल तर मात्र भारतीय टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर शिखर धवनऐवजी पुजाराला संधी देण्यात येईल. तसंच उमेश यादवऐवजी कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजाला स्थान मिळेल असं बोललं जात होतं. पण लिक झालेली ही टीम खरी असेल तर मात्र पुजारा आणि दुसऱ्या स्पिनरला या मॅचमध्येही संधी मिळालेली नाही, असं म्हणावं लागेल.