श्रेयस अय्यरचा मोठा सन्मान, Icc Player of the month म्हणून निवड
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज (14 मार्च) फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली.
मुंबई : आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज (14 मार्च) फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. आयसीसीचा प्लेअर ऑफ द मन्थ (Icc Player of the month) हा पुरस्कार टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला मिळाला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. श्रेयसला त्याने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. (team india star batsman shreyas iyer win icc player of the month award)
या पुरस्कारासाठी एकूण 3 खेळाडूंना नामांकन देण्यात येतं. त्यानुसार आयसीसीने श्रेयस व्यतिरिक्त यूएईच्या वृत्य अरविंद आणि नेपाळच्या दीप्रेंद्र सिंग एरीला पुरुष गटातून नामांकन देण्यात आलं होतं. मात्र श्रेयसने या दोघांना पछाडत हा पुरस्कार मिळवला आहे.
श्रेयसला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग 3 नाबाद अर्धशतकं ठोकली होती. श्रेयसने या मालिकेत एकूण 204 धावा केल्या होत्या.
श्रेयस भारतात सलग 3 अर्शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. तसंच श्रेयसने 3 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. श्रेयसला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं होतं.
कसोटी मालिकेतही चमकला
श्रेयसने टी 20 मालिकेनंतर टेस्ट सीरिजमध्ये धमाका सुरुच ठेवला. श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 27 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शानदार कामगिरी केली.
श्रेयसने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी संघाचा डाव सावरला. मात्र दुर्देवाने तो नर्व्हस नाईन्टीचा शिकार ठरला.
श्रेयस 92 धावांवर आऊट झाला. तर दुसऱ्या डावात त्याने 67 धावांचं योगदान दिलं. श्रेयसच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
श्रेयस अय्यरची क्रिकेट कारकिर्द
4 कसोटी - 388 धावा
26 वनडे - 947 धावा
36 टी 20 - 809 धावा