मुंबई : टी 20 विश्वचषकाची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होत आहे. युएईमध्ये या स्पर्धेची सुरुवात होणार असून, आयसीसीकडून आयोजित या मानाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. संघाकडून असणाऱ्या अपेक्षा पाहता निवड समितीकडून यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामुळं त्यांचं नशीब फळफळलं आहे. पण, काही खेळाडूंचं स्वप्न मात्र तुटलं आहे. ज्यामध्ये संघातील दोन खेळाडूंची निवड न होणं अनेकांनाच धक्का देऊन गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप यादव - भारतीय संघातून महेंद्र सिंह धोनी यानं संन्यास घेतल्यानंतरच कुलदीपच्या करिअरला उतरती कळा लागली. T20 विश्वचषकासाठी कुलदीपची संघात निवड करण्यात आलेली नाही. धोनी संघातून बाहेर पडला आणि तिथे कुलदीपसाठी उपलब्ध असणाऱ्या संधी कमी झाल्या. याचा त्याच्या गोलंदाजीवरही परिणाम झाला. 


कुलदीपला 'चायनामेन गोलंदाज' म्हणून ओळखला जातं. ही गोलंदाजीची अत्यंत वेगळी पद्धत आहे. ज्यामध्ये गोलंदाज बोटांच्या ऐवजी मनगटानं चेंडूला फिरकी देतो. गोलंदाजीमध्ये सातत्य नसल्यामुळे कुलदीपला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 


मनीष पांडे - निवड समितीनं फलंदाज मनीष पांडे याचं नावही टी20 संघातून कमी केलं आहे. किंबहुना त्याच्या नावाला प्राधान्यस्थानीच ठेवलं नाही. त्यामुळे आता मनीष पांडेची कारकिर्दही धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. मनीष आता पर्यंत भारतासाठी 39 टी 20 सामने खेळला आहे. जिथं त्यानं 709 धावा केल्या आहेत. 


मनीष फलंदाजीमध्ये डगमगल्यास संघाच्या मधल्या फळीवर याचे थेट परिणाम दिसून येतात. ज्यामुळं संघाचंही मोठं नुकसान होतं. एकेकाळी संघाचं भविष्य मानल्या जाणाऱ्या या खेळाडूच्या कारकिर्दीला मिळालेलं हे वळण त्याच्यासाठी घातक ठरत आहे.