रोहितयूग संपलं? श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार... `या` दोन खेळाडूंची नावं आघाडीवर
टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडिया आणि झिम्बाब्वेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
India tour of Sri Lanka 2024 : टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियातल्या (Team India) सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सध्या टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असून टीम इंडियाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपण्यात आलं आहे. भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मलिकेनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (Team India Tour of Sri Lanka) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदी नव्या खेळाडूची वर्णी लागू शकते. यासाठी दोन खेळाडू दावेदार आहेत.
टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात निवृत्ती घेतली आहे. तसंच श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीदेखील रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
रोहित-विराट थेट सप्टेंबरमध्ये मैदानात?
रोहित शर्मा आणि विराट कोहली आता थेट सप्टेंबरमध्ये मैदानात उतरणार आहेत. सप्टेंबरमध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यात रोहित आणि विराट खेळणार आहेत. टीम इंडिया सप्टेंबर आणि जानेवारीदरम्यान तब्बल 10 कसोटी सामने खेळणार आहे. तसंच पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्याआधी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध एकदिवस मालिका खेळणार आहे. सरावासाठी रोहित आणि विराटला ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी या दोघांची नावं
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्या तीन एकिदवसीय सामने खेळणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलचं (KL Rahul) नावही श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून आघाडीवर आहे. कर्णधारांबरोबरच श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहाणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.
वर्ल्ड कपमधून राहुल बाहेर
टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियातून केएल राहुल बाहेर होता. त्याला पंधरा खेळाडूंच्या संघातही स्थान देण्यात आलं नव्हतं. दुसरीकडे हार्दिक पांड्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली. ग्रुप, सुपर-8, सेमीफायनल आणि फायनलमध्ये हार्दिक पांड्याने टॉप क्लास कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटचं षटक टाकत हार्दिक पांड्यान टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचं पारडं जड आहे.