गुवाहाटी : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 ला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजची मॅच भारत जिंकला तर सीरिजही भारत जिंकेल पण आणखी एक रेकॉर्ड नावावर करेल. ७० वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट टीमला हे रेकॉर्ड बनवता आलं नव्हतं. आजची मॅच जिंकली तर भारत ऑस्ट्रेलियाला लागोपाठ ४ सीरिजमध्ये हरवण्याचा पराक्रम करेल. २०१६मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेली टी-20 सीरिज भारतानं ३-०नं जिंकली होती. त्यानंतर भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव झाला होता, आणि आता वनडे सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला ४-१नं हरवलं.


टेस्ट आणि वनडेच्या आयसीसी क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर टी-20मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज ३-०नं जिंकली तर विराट सेना टी-20मध्येही पहिल्या क्रमांकच्या जवळ पोहोचेल.


टी-20 क्रमवारीमध्ये भारत ११६ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ३-०नं जिंकला तर क्रमवारीमध्ये पाकिस्तानला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. टी-20 क्रमवारीमध्ये १२५ पॉईंट्ससह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान १२१ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये २-१नं विजय मिळवला तर टेस्ट आणि वनडे पाठोपाठ टी-20मध्येही पहिल्या क्रमांकावर जायची नामी संधी भारताला आहे.