Ravindra Jadeja Joined BJP : भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) राजकारणात एन्ट्री केली आहे. जडेजा भारतीय जनता पक्षाचा (BJP) सदस्य बनला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) गुजरातमधल्या जामनगर मतदार संघात भाजपची आमदार आहे. रिवाबाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाची (Bharatiya Janata Party Member) माहिती दिली आहे. जडेजाने नुकतीच टी20 वर्ल्ड कप 2024 मधून निवृत्तीची घोषणा केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाची राजकारणात एन्ट्री
रवींद्र जडेजा पत्नी रिवाबाबरोबर अनेकेवळा निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत रवींद्र जडेजाने रिवाबारोबर मतदारसंघ पिंजून काढला. अनेक रोड शोमध्ये रिवाबाबरोबर रवींद्र जडेजाने सहभाग घेतला होता. आता रवींद्र जडेजाने अधिकृतरित्या भाजपची सदस्यता घेतली आहे. रिवाबाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तीने रवींद्र जडेजा भाजपचा प्राथमिक सदस्य बनला असल्याची माहिती दिली आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.



जडेजाची क्रिकेट कारकिर्द
रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. जडेजा टीम इंडियासाठी 74 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. यात त्याने 515 धावा आणि 54 विकेट घेण्याची कामगिरी केलीय. पंधरा धावात 3 विकेट ही त्याची टी20 क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. टी20 वर्ल्ड कपनंतर रवींद्र जडेजाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.


जडेजा टीम इंडियासाठी आतापर्यंत 197 एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याने 2756 धावा केल्या आहेत. तर 220 विकेट त्याच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यात 33 धावात 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. जडेजा टीम इंडियासाठी 72 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 3036 धावा केल्याा असून यात चार शतकांचाही समावेश आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये 294 विकेट त्याच्या नावावर आहेत. 


आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्समधून खेळतो. आयपीएलमध्ये जडेजा आतापर्यंत 240 सामने खेळलाय. यात त्याने 2959 धावा आणि 160 विकेट घेतल्या आहेत.