Mumbai Stampede Like Situation Wankhede Stadium: मुंबईमध्ये गुरुवारी टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं. एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमदरम्यान खुल्या बसमधून काढण्यात आलेली विनिंग परेड म्हणजेच शोभायात्रेनंतर वानखेडे स्टेडियममध्ये सर्व खेळाडूंचा सत्कार करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मात्र या कार्यक्रासाठी मरिन ड्राइव्हवर मोठ्याप्रमाणात चाहत्यांची गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी तर अगदी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. काही पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगितलं जातं. असं असतानाच आता महाराष्ट्रातील एका आमदाराने उत्तर प्रदेशमधील कथित धर्मगुरु असलेल्या भोले बाबाच्या सत्संगाच्या कार्यक्रमात हाथरस येथे चेंगराचेंगरीत 121 जणांनी प्राण गमावल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत एवढी गर्दी होईल अशा कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबईमध्ये हाथरससारखी दुर्घटना होण्यापासून थोडक्यात वाचली, असंही या आमदाराने म्हटलं आहे.


देवाचे आभार मानले पाहिजे की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण देवाचे आभार मानले पाहिजेत की मुंबईमध्ये हाथरससारखी दुर्घटना घडली नाही, असं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी गुरुवारी जमलेल्या अनियंत्रित गर्दीचा व्हिडीओ शेअर करत हथरसमध्ये 121 जणांनी प्राण गमवल्याच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी वानखेडे स्टेडियमवर अशाप्रकारे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशाप्रकारे कशी काय परवानगी देण्यात आली? असा प्रश्न सत्यजित तांबेंनी उपस्थित केला आहे. तसेच हे क्रिकेटवरील प्रेम नसून वेडेपणा आहे, असं म्हणत तांबेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.


असा धोका कसा पत्करू शकतो?


हाथरसमध्ये 121 जणांचा जीव गमावल्याच्या दुसऱ्याच दिवशी वानखेडे स्टेडियमवर प्रथम येणाऱ्यास प्रथम येणाऱ्यास परवानगी देत प्रवेश देण्याचा धोका प्रशासन कसा पत्करू शकतं? असा सवाल सत्यजित तांबेंनी उपस्थित केला आहे. तसेच हा सारा प्रकार म्हणजे देशासाठी किंवा क्रिकेटबद्दल असणारं प्रेम दर्शवत नाही तर हा शुद्ध वेडेपणा आहे, असंही सत्यजित तांबे म्हणाले आहेत. आपण अशाप्रकारच्या अनागोंदी आणि बेपर्वाईपेक्षा सुरक्षेला आणि विवेकबुद्धी कायम ठेवण्यास प्राधान्य दिलं पाहिजे, अशी अपेक्षा सत्यजित तांबेंनी व्यक्त केली आहे. 



चाहते एकमेकांवर पडले...


गुरुवारी हजारोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमी नरिमन पॉइंट, वानखेडे स्टेडियमवर पोहचल्याचं पाहायला मिळालं. नरिमन पॉइंट येथे हजारोंच्या संख्येनं भारतीय क्रिकेट चाहते जमल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी अगदी धक्काबुक्कीही झाली. काही चाहते पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवरही चढले होते. या गोंधळात काहीजण एकमेकांच्या अगावर पडले. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत एकमेकांवर पडलेल्यांना बाजूला केलं.



14 जण जखमी


गुरुवारी मुंबईतील सेलिब्रशनदरम्यान 14 जण जखमी झाले. यामधील 11 जणांवर जी. टी. रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्व रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर दोघांवर नायर रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आलं.