टी-20 वर्ल्डकपमध्ये किवींसमोर कधीही जिंकले नाहीत कांगारू! आज काय होणार?
T20 वर्ल्डकप 2021चा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे पारडं जड असल्याचं मानलं जातंय.
दुबई : T20 वर्ल्डकप 2021चा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे पारडं जड असल्याचं मानलं जातंय.असं असलं तरीही तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखता येणार नाही. पाकिस्तानविरुद्ध मॅथ्यू वेडने अवघ्या तीन चेंडूंत सामना फिरवला. अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाला असंच काही करावं लागण्याची शक्यता आहे.
T20 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांमध्ये एकच सामना झाला असून त्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. याचाच अर्थ न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत हरवलं नाही. त्यामुळे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा बदला घेऊन खातं बरोबरीत आणायचं आहे.
T-20च्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघांमध्ये 14 सामने खेळले गेले आहेत आणि यापैकी 9 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाने चार वेळा विजय मिळवला आहे.
न्यूझीलंडसाठी ही दिलासादायक बाब आहे की 2021 मध्ये त्याची कामगिरी खूपच चांगली झाली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, आशियाई खेळपट्ट्यांमध्ये या दोन संघांमध्ये एकच सामना झाला असून त्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
काय आहे रेकॉर्ड?
T-20 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांचा एकमेव सामना 2016 साली धर्मशालाच्या मैदानावर झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव केला. सँटनर आणि सोधी या जोडीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूप त्रास दिला होता. यावेळीही हे दोन्ही कांगारू फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.