अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये या खेळाडूंवर असेल नजर
अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
क्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. शनिवारी न्यूझिलंडच्या बे ओव्हल मैदानामध्ये ही मॅच होईल. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला होता. या विजयामध्ये भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
भारताचा कॅप्टन पृथ्वी शॉनं भारताला आतापर्यंतच्या सगळ्या मॅचमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे. पृथ्वीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ९४, पपुआ न्यू गिनीविरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद ५७, बांग्लादेशविरुद्ध ४९ आणि पाकिस्तानविरुद्ध ४१ रन्स बनवले होते.
भारताचा उपकर्णधार शुभमन गिलसाठी ही स्पर्धा शानदार राहिली आहे. शुभमननं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ६३, झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ९०, बांग्लादेशविरुद्ध ८६ आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद १०२ रन्सची खेळी केली होती.
पहिल्याच मॅचमध्ये कमलेश नागरकोटीनं ताशी १४५ किमीनं बॉलिंग करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नागरकोटीनं ७ ओव्हरमध्ये २९ रन्स देऊन ३ विकेट घेतल्या. इतर मॅचमध्ये नागरकोटीनं विकेट घेतल्या नसल्या तरी विरोधी टीममध्ये नागरकोटीनं त्याच्या जलद बॉलिंगनं घाबरवून टाकलं आहे.
शिवम मावीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३, पपुआ न्यू गिनीविरुद्ध २ आणि बांग्लादेशविरुद्ध २ विकेट घेतल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये अनुकूल रॉयनं ७.१ ओव्हरमध्ये २० रन्स देऊन ४ विकेट घेतल्या. पपुआ न्यू गिनीविरुद्धच्या मॅचमध्ये अनुकूलनं ५ विकेट घेतल्या होत्या.
ग्रुप मॅचमध्ये मनजोत कालराची बॅट फारशी तळपली नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये मनजोतनं ९९ बॉल्समध्ये ८६ रन्स केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मनजोतनं ४७ रन्स केल्या होत्या.