हे ६ जण देणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखत
टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज पाठवलेल्यांपैकी ६ जणांची मुलाखत कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालची क्रिकेट सल्लागार समिती घेणार आहे. प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्यात होईल.
मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांमध्ये भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचंही नाव आहे. याचबरोबर न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आणि श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी, वेस्ट इंडिजचे माजी ऑलराऊंडर आणि अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स, टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत, टीम इंडियाचे माजी फिल्डिंग प्रशिक्षक रॉबिन सिंग हेदेखील मुलाखत देणार आहेत. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हे सगळे ६ उमेदवार क्रिकेट सल्लागार समितीला प्रेझेंटेशन देणार आहेत. कपिल देव यांच्याबरोबरच या समितीमध्ये अंशुमन गायकवाड आणि महिला टीमच्या माजी कर्णधार शांथा रंगस्वामी आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होत असताना कर्णधार विराट कोहलीने रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाले, तर आनंद होईल, असं वक्तव्य केलं होतं.
वर्ल्ड कपपर्यंत रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकारी करारबद्ध होते. पण लगेचच वेस्ट इंडिज दौरा असल्यामुळे या सगळ्यांचा करार ४५ दिवसांनी वाढवण्यात आला. रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, संजय बांगर बॅटिंग प्रशिक्षक, भरत अरुण बॉलिंग प्रशिक्षक आणि आर श्रीधर फिल्डिंग प्रशिक्षक आहेत. ३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीमध्ये भारताचा वेस्ट इंडिज दौरा आहे.
माईक हेसन आणि टॉम मूडी यांनी या पदासाठी अर्ज केल्याच्या बातम्या याआधीच प्रसिद्ध झाल्या होत्या. तर फिल सिमन्स प्रशिक्षक असताना आयर्लंड आणि अफगाणिस्तानने चांगली कामगिरी केली होती. सिमन्स हे काही काळ वेस्ट इंडिजचेही प्रशिक्षक होते. त्याचवेळी वेस्ट इंडिजने २०१६ सालचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर २०१७ साली ते अफगाणिस्तानचे प्रशिक्षक झाले.
रॉबिन सिंग हे याआधी टीम इंडियाचे फिल्डिंग प्रशिक्षक होते. रॉबिन सिंग फिल्डिंग प्रशिक्षक असताना टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात २००७ सालचा पहिलावहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी भारतीय टीमसोबत असलेल्या लालचंद राजपूत यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. लालचंद राजपूत हे काही काळ अफगाणिस्तानचे आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षकही होते.
माईक हेसन यांनी नुकताच आयपीएलच्या पंजाब टीमच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. माईक हेसन हे ६ वर्ष न्यूझीलंडच्या टीमचे प्रशिक्षक होते. २०१५ साली प्रशिक्षक असताना न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला होता. माईक हेसन प्रशिक्षक असताना २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये पोहोचली होती. तर २०१८ साली इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला, तेव्हा न्यूझीलंड टेस्ट क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली.
रवी शास्त्रीसोबत असताना टीम इंडियाला २०१५ वर्ल्ड कप, २०१६ टी-२० वर्ल्ड कप आणि २०१९ वर्ल्ड कप जिंकता आला नाही, पण कोहली-शास्त्री यांच्या जो़डीने टीम इंडियाला टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचवलं. तसंच ऑस्ट्रेलियातही भारताने ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजय मिळवला.
जून २०१६ पर्यंत रवी शास्त्री टीम इंडियासोबत होते, पण टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेंची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पराभवानंतर विराट कोहलीशी मतभेद झाल्यामुळे अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यानंतर पुन्हा रवी शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली.