क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याच्या पत्नीबद्दल काही खास गोष्टी....
यंदाचे वर्ष हे क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी लग्नमय ठरले, असे म्हणायला काही हरकत नाही.
मुंबई : यंदाचे वर्ष हे क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी लग्नमय ठरले, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण यावर्षी भारतीय गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर क्रिकेटर भुवनेश्वर कुमारने नुपूर नगरशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर बहुचर्चित विवाहसोहळा पार पडला. तो म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. यानंतर आणखी एक क्रिकेटर बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे तो म्हणचे क्रुणाल पांड्या.
२७ डिसेंबरला क्रुणालचे लग्न
टीम इंडियातील ऑल राऊंडर क्रिकेटर क्रुणाल पांड्या २७ डिसेंबरला त्याच्या प्रेयसी पंखुरीसोबत विवाहबंधनात अडकेल. मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडेल. अलिकडेच त्यांनी केलेले प्री वेडींग फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काहीसे हटके स्टाईलमध्ये हे फोटोशूट करण्यात आले होते. मात्र क्रुणालची ही प्रेयसी नक्की आहे तरी कोण ? या जाणून घेऊया...
कोण आहे ती?
पंखुरी ही मॉडेल आणि प्रोफेशनल स्टायलिस्ट आहे.
सध्या ती फिल्म मार्केटिंग करत असल्याचे समजते.
खरंतर तिला क्रिकेट हा खेळ कळत नाही आणि आवडतही नाही. मात्र क्रुणालमुळे तिला क्रिकेटचे महत्त्व कळले आणि तिने क्रिकेट पाहण्यास हळूहळू सुरूवात केली. तसंच क्रुणालचे सामने ती आर्वजून पाहते.
क्रुणाल म्हणाला...
तसंच एका मुलाखतीत क्रुणाल म्हणाला की, पंखुरी माझ्या मित्राची मैत्रीण असून एका कार्यक्रमात दोन वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि मग आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तिच्यातील साधेपणा आणि साहाय्य करण्याची वृत्ती मला फार आवडते.’