कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि निर्णायक वनडे सामना कानपूर येथे रंगणार आहे. पहिल्या वनडेत पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या वनडेत दमदार यश मिळवले. भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. 


दोन्ही संघाचे प्लेअर जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामूळे हा सामना चुरशीचा होणार एवढ नक्की. पण तरीही या सामन्यात जो टॉस जिंकेल तो संघ मॅच जिंकेल असे मत माजी कॅप्टन सौरभ गांगुली याने व्यक्त केले आहे. पण कानपूरचे ग्रीनपार्क स्टेडियम भारतासाठी लकी असल्याने या मैदानावर टीम कोहलीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
ग्रीन पार्कवर खेळपट्टीसभोवतालचे २० यार्ड मैदान मंद गतीचे आहे. याचा फिरकीपटूंना अधिक लाभ मिळू शकणार आहे. यादृष्टीने कुलदीपच्या
तुलनेत अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. भुवनेश्वर आणि बुमराह यांना जर न्यूझीलंडच्या सलामीवारांना रोखता आले नाही तर विजय अशक्य असल्याचे मतही सौरभ याने यावेळी व्यक्त केले. 
सौरभ गांगुलीच्यामते, न्युझीलंडची टीम बॉलिंगमध्ये बेस्ट आहे, बोल्ट आणि सॅन्टनर हे मधल्या टप्प्यात टिच्चून मारा करतात. पण सामना जिंकण्यासाठी फलंदाजांचीही साथ मिळणे क्रमप्राप्त ठरते. त्यामूळे भारताने मालिका जिंकण्यासाठी कुठलाही गाफिलपणा आणि आत्मसंतुष्टी न बाळगता नेहमीसारखा खेळ करायला हवा असेही त्याने सांगितले.