मुंबई : क्रिकेट आणि त्यातील खेळाडू याबाबत नेटीझन्सना प्रचंड उत्साह असतो. त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यात अधिक रस असतो. डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म सेमरश (SEMrush) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडू सर्चच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. पहिल्या तीन क्रमांकावर भारतीय खेळाडूंचाच दबदबा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्च यादीत पहिल्या तीन क्रमांकावर भारतीय खेळाडू आहेत. 2018 पेक्षा 2019मध्ये या सर्चमध्ये दीड टक्के वाढ झाली आहे. भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. 


2019 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कोहलीला एक महिन्याच्या सरासरीत 20 लाख वेळा सर्च करण्यात आलं. तर धोनी आणि रोहितला एका महिन्यात सरासरी 10 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे फक्त भारतीय खेळाडूंनाच नाही तर भारतीय संघाला देखील 2019 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलं आहे. 2018 मध्ये इंग्लंड संघाला सर्वाधिक वेळा सर्च केलं होतं. वेस्ट इंडीजचा संघ दोन्ही वर्षी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यामुळे भारतीय टीमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनआयएला मिळालेल्या एका निनावी पत्रामध्ये कर्णधार विराट कोहलीसह भारतीय टीमला धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय टीमवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीती या पत्रात वर्तवण्यात आली आहे.


दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रामध्ये अनेक बडी नावं आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट टीम, विराट कोहली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, जे.पी.नड्डा आणि मोहन भागवत यांच्या नावांचा समावेश आहे.