`या` क्रिकेटपटूच्या पत्नीला करायचेय पुन्हा लग्न
सध्या सर्वत्र बॉलिवूड इंडस्ट्रीतील `दीपवीर` आणि राखी सावंत-दीपक कलाल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर यासंबंधीच्या अनेक पोस्ट व मिम्सही पाहायला मिळत आहेत.
नवी दिल्ली : सध्या सर्वत्र बॉलिवूड इंडस्ट्रीतील 'दीपवीर' आणि राखी सावंत-दीपक कलाल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर यासंबंधीच्या अनेक पोस्ट व मिम्सही पाहायला मिळत आहेत. मात्र, या सगळ्या भाऊगर्दीत आणखी एका जोडप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांची पत्नी शनायरा हिने ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलियन असलेल्या शनायरा यांनी २०१३ मध्ये वसीम अक्रम यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला यंदा पाच वर्ष पूर्ण होत आहेत. याची खास आठवण म्हणून शनायरा यांनी त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला. 'मुव्हिंग केक'च्या थीममुळे वसीम-शनायरा यांच्यासाठी हा कार्यक्रम खूपच खास ठरला होता. सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चाही झाली होती.
हाच व्हीडिओ शेअर करत शनायरा यांनी आपल्या लग्नाच्या आठवणींना मजेशीर पद्धतीने उजाळा दिला आहे. लग्न करण्यापूर्वी तू मला असे काही करायला लागेल, हे सांगितले नव्हतेस, अशी लाडिक तक्रार असलेला संदेश शनायरा यांनी ट्विट केला. या गोष्टीसाठी पुन्हा लग्न करुयात, असेही शनायरा यांनी म्हटले.
वसीम अक्रम यांनीही तितक्याच मजेशीरपणे पत्नीच्या ट्विटला रिप्लाय दिला. तुला माहिती आहे ना, मला डायबेटिस आहे, असे ट्विट त्यांनी म्हटले. साहजिकच इतरांनीही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजत आहे.