सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघाच्या खेळाडुंमध्ये अनेक शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. ऑस्ट्रेलियन खेळाडुंकडून प्रतिस्पर्ध्यांना केले जाणारे स्लेजिंग नेहमीचा वादाचा विषय राहिले आहेत. मात्र, यावेळी भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याच्या एका कृतीमुळे या स्लेजिंगचा गोड शेवट झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताचा संघ ५ बाद ४७ अशा अवघड परिस्थितीत सापडला होता. त्यावेळी रिषभ पंत मैदानावर फलंदाजी करत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने रिषभ पंतची एकाग्रता भंग करण्यासाठी स्लेजिंग करायला सुरुवात केली. एकदिवसीय संघात आता धोनी परतला आहे. तू आता होबार्ट हरिकेन्सकडून खेळायला सुरवात कर. होबार्ट हे छान शहर आहे एकदा विचार कर. आपण त्याठिकाणी तुला छानसे घर घेऊन देऊ. आम्ही तुला डिनरलाही नेऊ? फावल्या वेळेत तू मुलांना सांभाळशील का? मी आणि माझी बायको बाहेर जेवायला किंवा सिनेमाला जाऊ तेव्हा तू आमची पोरं सांभाळशील का?, असा काहीसा मजेशीर संवाद मैदानात झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, यानंतर रिषभ पंतने खरोखरच टीम पेनच्या घरी जाऊन त्याच्या मुलांना सांभाळले. पेनची पत्नी बोनी हिने 'बेस्ट बेबीसीटर' अशी कॅप्शन देऊन हे सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. अनेकांनी पंतच्या या खिलाडूवृत्तीचे कौतुकही केले. 



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यात भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. चौथा कसोटी सामना सिडनी येथे होणार आहे.