मुंबई : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय खेळाडूंनी (Indian Players) जबरदस्त कामगिरी केली. भारताने आतापर्यंत 7 पदकांची कमाई केली आहे. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे.


योगेश कथुनियाची दमदार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या योगेश कथुनियाने (Yogesh Kathuniya) पॅरालिम्पिकमधील पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत एफ 56 (Men's discus throw F56) प्रकारात रौप्य पदक जिंकलं. वयाच्या आठव्या वर्षी अर्धांगवायू झालेल्या योगेशने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 44.38 मीटर थाळी फेकून दुसरं स्थान पटकावलं


योगेश कथुनियाने 2019 मध्ये दुबईत झालेल्या वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियन्सशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे त्याला टोकियो पॅरालिम्पिक्सचं तिकीट मिळालं. या स्पर्धेत त्याने पुढची मजल मारुन, रौप्य पदकाची कमाई केली. 


योगेशची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2018 पासून सुरु झाली. आशियाई स्पर्धेत योगेशने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बर्लिनमध्ये पॅरा ऍथलिट ग्रां प्रीमध्ये योगेशने 45.18 मीटर थाळीफेक करुन, वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये योगेश पहिल्यांदाच खेळत होता, पहिल्याच प्रयत्नात त्याने रौप्य पदक पटकावलं.


वयाच्या आठव्या वर्षी अर्धांगवायू


वयाच्या आठव्या वर्षापर्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्या योगेश कथुनियाला 2006 मध्ये व्हिलचेअरवर यावं लागलं. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी त्याची आई स्वत: फिजिओथेरेपी शिकली. तीन वर्षानंतर आईच्या मेहनतीला यश आलं, योगेश पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला. योगेशने टोकियो पॅरालिम्पिक्समधील सुवर्ण कामगिरी पाहून त्याच्या कौतुकासाठी आज अख्खा देश त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे.


बहादूरगडच्या राधा कॉलनित राहणाऱ्या योगेच्या कुटुंबियांनी टीव्हीवर योगेशचा सामना पाहिला. योगेशने रौप्य पदक पटकावताच ढोल ताशाच्या तालावर जल्लोष केला. योगेशने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे तो पदक जिंकणार असा विश्वास कुटुंबियांना होता. हा विश्वास योगेशने व्यर्थ जाऊ दिला नाही.