टेस्ट सीरीजमध्ये भारतीय संघासमोर असणार ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान
वनडे आणि टी-२० सीरीजनंतर आता टेस्ट सीरीजमध्ये परीक्षा
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० सीरीज झाल्यानंतर आता टेस्ट सीरीज खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे सीरीज जिंकली तर भारताने टी-२० सीरीज जिंकली, पण आता सर्वांचे लक्ष ४ सामन्यांच्या टेस्ट सीरीजवर असणार आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने हे मान्य केले आहे की या वेळी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या संघासमोर अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
कर्णधार कोहलीला माहित आहे की, टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं तगडं आव्हान असणार आहे. भारतीय संघाला कसोटी मालिकेतही अशीच स्पर्धा दाखवावी लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची टेस्ट सीरीज 17 डिसेंबरपासून सुरु होईल. पहिला सामना हा डे-नाईट असणार आहे. विराट कोहलीने म्हटलं होतं की, "आम्हाला स्पर्धात्मक बनले पाहिजे. यावेळी ऑस्ट्रेलिया हा एक मजबूत संघ आहे. आपल्या बाजूने आम्हाला अधिक स्पर्धात्मक बनावे लागेल.'
गेल्या वेळी ऑस्ट्रेलिया दौर्यात भारताने प्रथमच टेस्ट सीरीज २-१ ने जिंकून इतिहास रचला होता, परंतु त्यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ संघात नव्हते. ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करणे फार कठीण आहे, खासकरुन त्यांच्या जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांविरूद्ध. 'मर्यादित षटकांपेक्षा कसोटीत तुम्हाला अधिक शिस्त दाखविण्याची गरज असते.' असं विराटने म्हटलं आहे.
या दौर्यावर विराट कोहली फक्त पहिला सामना खेळेल आणि त्यानंतर तो मायदेशी परतेल. विराट कोहलीने म्हटले आहे की, "कसोटीतही आम्हाला अशीच स्पर्धा कायम ठेवायची गरज आहे. फलंदाज म्हणून तुम्हाला कसोटीत अधिक शिस्त दाखवण्याची आवश्यकता आहे. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यापूर्वी आपल्याला हे समजले पाहिजे की जर आपल्याला संधी मिळाली तर आपण तेथे गुण मिळवू शकतो."