जब जब पाकिस्तान भिडा, तब विराट खडा! `असा` ठरला कोहली विजयाचा शिल्पकार
किंग कोहलीचा `नादच खुळा`, पाकिस्तानवरूद्धच्या सामन्यात ठरला मॅन ऑफ द मॅच!
हरिश मालुसरे, झी मीडिया, मुंबई Sport News : वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामना अगदी श्वास रोखून धरणारा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला असताना आर. आश्विनने एक धाव घेत भारताला सामना जिंकून दिला. एकवेळ अशी होती की सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या पारड्यात होता मात्र खेळपट्टीवर किंग विराट कोहलीने शेवटपर्यंत थांबत एक बाजू लावून धरली होती. विराटने 53 चेंडूमध्ये 82 धावा केल्या यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकार खेचले.
असा ठरला विराट विजयाचा शिल्पकार
पाकिस्तानच्या 160 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. के. एल. राहुलला 4 धावांवर नसीम शहाने बाद केला. पाठोपाठ रोहित शर्मालाही हॅरीस रॉफने 4 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही 15 धावा काढून माघारी परतला.
भारताच्या विकेट्स पडत होत्या त्यानंतर संघ व्यवस्थापनाने अक्षरला पाठवलं मात्र तोही प्रयोग फसला. विराट आणि अक्षरमध्ये योग्य ताळमेळ न झाल्याने अक्षरही बाद झाला. अखेर भारताची अवस्था 31धावांवर 4 विकेट्स होत्या, भारताला कोण वाचवणार?, कारण कोहलीचा याआधीचा फॉर्म पाहता तो शेवटपर्यंत सामना घेऊन जाईल असा कोणाला विश्वास नव्हता. कोहलीने टीकाकारांच्या तोंडाला पानं पुसत आजचा विजय साकार केला.
विराट आणि हार्दिकने संयमी खेळी केली आणि विकेट टिकवून ठेवल्या. दोघांनीही सुरूवातीला एक दोन धावा घेत धावफलक चालू ठेवलं. जसजसा रन रेट वाढत गेला त्यानंतर दोघांनी मोहम्मद नवाझला टार्गेट केलं. नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत मिशनला खरी सुरूवात केली.
अखेरच्या षटकामध्ये भारताला 16 धावांची गरज होती, पांड्या स्ट्राईकवर होता मात्र तो मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर आलेल्या कार्तिकने एक धाव घेतली. विराट स्ट्राईकवर आल्यावर त्याने दोन धावा घेतल्या, 3 चेंडूत 13 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर त्याने षटकार खेचला आणि तो नो बॉल देण्यात आला त्यानंतर फ्री हिटचाही वाईड गेला. त्यामुळे आणखी एक फ्री हिट त्यावर मात्र विराट बोल्ड झाला मात्र त्याने प्रसंगावधान ठेवत तीन धावा काढल्या. जो सामना 3 चेंडूत 13 धावांवर आला होता तो शेवटला 2 चेंडूत 2 धावांची गरज होती.
स्ट्राईकवर दिनेश कार्तिक होता मात्र तो बाद झाला त्यामुळे सामन्याला परत कलाटणी आली. त्यानंतर आलेल्या आर. आश्विनने चतुराईने चेंडू वाईड जाऊन दिला आणि नंतरच्या चेंडूवर एक धाव घेत विजय साकार केला. कोहली वर्ल्ड कपअगोदर धावा करण्यासाठी संघर्ष करत होता त्यानेच या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली आणि सामन्याचा शिल्पकार ठरला.