Paris Olympic: रोजचा चष्मा, खिशात हात अन् थेट Silver Medal; त्याच्या नादखुळा कार्यक्रमाने जगाला लावलं वेड
Paris Olympic: ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झालेला तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण त्याने अत्यंत सहजपणे निशाणा साधत रौप्यपदक जिंकलं आहे. त्याने कोणतेही प्रोफेशनल ग्लासेस घातले नव्हते. याउलट त्याचा एक हातात खिशात होता.
Paris Olympic: ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यात जेव्हा ही संधी मिळते तेव्हा प्रत्येकावर सर्वोत्तम कामगिरी करत देशाला पदक मिळवून देण्याचं दडपण असतं. ही संधी आयुष्यात वारंवार येत नसल्याने खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावत सर्व काळजी घेत असतात. पण तुर्कीमधील शूटरने जणू काही बागेत फिरायला आलो आहोत अशाप्रकारे सहजपणे 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे त्याने यावर डोळ्यांवर आपला नेहमीचा चष्मा घातलेला होता. त्याच्या या स्वॅगची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
शूटिंग स्पर्धेत नेमबाज अधिक अचूकतेसाठी विशेष चष्म्यासह बरेच गियर घालतात. तसंच आजुबाजूचा गोंधळ आपल्याला दुर्लक्षित करु नये याचीही काळजी घेतात. पण तुर्कीचा एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेकने (Yusuf Dikec) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपली प्रतिभा दाखवून दिली. सोशल मीडियावर शूटिंगचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. डिकेकने त्याचा साथीदार सेव्हल इलायदा तरहानसह (Sevval Ilayda Tarhan) 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. डिकेकने स्पर्धेसाठी मर्यादित गियर आणले होते. मात्र तरीही त्याला रौप्यपदक जिंकण्यापासून कोणी रोखू शकलं नाही.
युसूफ डिकेकने आपला नियमित चष्मा आणि इअरप्लग घातले होते. मात्र तरीही तो अत्यंत सहजपणे बहुतेक स्पर्धा जिंकला. निशाणा साधताना त्याचा एक हातात खिशात होता. त्याच स्थितीत त्याने पिस्तूल उचललं आणि निशाणा साधला. यानंतर त्याने साथीदारासह रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली.
तुर्कीचा हा 51 वर्षीय नेमबाज त्याच्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. 2008 बीजिंगमध्ये तो पहिल्यांदा खेळला होता. आपल्या या कारकिर्दीत अखेर तो पहिलं पदक जिंकण्यात यशस्वी झाला आहे आणि तेदेखील अत्यंत स्टाईलमध्ये जिंकला आहे.
नेमबाजी स्पर्धेचा अंतिम सामना बरोबरीत सुटला आणि सर्बियाने पुनरागमन करत सुवर्णपदक निश्चित केले. झोराना अरुनोविक आणि दामिर माइकेक यांनी 8-2 पिछाडीवरून आधाडी घेतली आणि डिकेक आणि तरहान यांच्यावर 16-14 गुणांसह विजय मिळवला. याच सामन्यात भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्यपदक मिळवले.