भारतीय महिला क्रिकेट टीम रचणार इतिहास?
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला चारणार धूळ?
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : जागतिक महिला दिनी भारतीय महिला क्रिकेट टीम इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. रविवारी ऑस्ट्रेलियतील मेलबर्न इथं जागतिक टी- ट्वेंटी विजेतेपदासाठी भारतीय महिला क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमने पहिल्यांदाच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियन टीमने सलग सहाव्यांदा फायनल गाठली. भारतीय महिलांच्या टीमने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड आहे.
संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, पूनम यादव, शिखा पांडे यांच्यावर प्रामुख्यानं भारताची मदार असेल. ऑस्ट्रेलियसमोर भारताच्या स्पिनरचं आव्हान असेल.
आता जागतिक महिला दिनी बलाढ्य कांगारुंना धूळ चारत भारतीय महिलांची ताकद जगाला दाखवण्याची संधी भारतीय महिला टीमला चालून आली आहे.
महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये टी-२० वर्ल्ड कप फायनल होणार आहे. रविवार ८ मार्चला ही फायनल रंगणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी सिडनीच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसल्याने सरस धावगतीच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यापूर्वी झालेल्या सात ट्वेन्टी-२० विश्वषचक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नव्हती. मात्र, यंदा पहिल्यांदाच भारतीय संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.