झारखंड : महिला खेळाडूंना प्रशिक्षण केंद्रात विनयभंग करण्यात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. झारखंडमध्ये दोन महिला खेळाडूंचा प्रशिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. या घटनेने क्रिडाविश्वात एकचं खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात दोन महिला बॅडमिंटनपटूंची ज्येष्ठ बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक राहुल कुमार यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी दोन्ही महिला बॅडमिंटनपटूंनी चाईबासा सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केलीय.  


चाईबासा इनडोअर स्टेडियममध्ये राहुलने महिला बॅडमिंटनपटूंचा विनयभंग केल्याचे खेळाडूंनी सांगितले आहे. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास परिणाम वाईट होईल, अशी धमकीही दिली आहे.  


स्टेडियममध्ये विनयभंगाची दोनदा घटना घडलीय. पहिली घटना 25 मे रोजी आणि दुसरी घटना 31 मे रोजी घडली. या संबंधित तक्रार पहिल्या महिला खेळाडूने 2 जून रोजी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे केली होती. तर दुसऱ्या महिला खेळाडूने 6 जून रोजी तक्रार केली होती. 


प्रशिक्षकावर अद्याप कारवाई नाही 
महिला खेळाडूंच्या तक्रारी दोन वेळा प्राप्त होऊन सुद्धा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी राहुल कुमारवर कोणतीही कारवाई केली नाही. या दोन्ही महिला खेळाडूंनी रविवारी एकत्र चाईबासा सदर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 


महिला खेळाडूंचा आरोप काय?
तक्रारीत एका महिला खेळाडूने आरोप केला आहे की, 31 मे 2022 रोजी राहुल कुमारने इनडोअर स्टेडियम चाईबासा येथे तिचा विनयभंग केला. तर दुसऱ्या खेळाडूने तक्रार पत्रात म्हटले आहे की, 25 मे रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास झारखंडचा प्रशिक्षक असल्याचा दावा करणारा वरिष्ठ खेळाडू राहुल कुमार याने स्टेडियममध्ये तिच्याशी गैरवर्तन केले आणि वारंवार तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.


आरोप फेटाळले
महिला खेळाडूंच्या तक्रारीवरून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. राहुलने आपल्यावरील आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हणत फेटाळले आहेत. तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.  


दरम्यान या प्रकरणामध्ये आता पोलिस तपासात काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.