मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आला आहे. दुखापग्रस्त शार्दुल ठाकूरऐवजी उमेश यादवची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये शार्दुल ठाकूरला दुखापत झाली होती. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरला या मॅचमध्ये फक्त १० बॉलच टाकता आले. पहिल्या दिवशी दुखापत झाल्यानंतर शार्दुल दुसऱ्या दिवशीही बॉलिंग टाकायला आला नाही. शार्दुल ठाकूरला मांडीची दुखापत झाली आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये उमेश यादवनं पहिल्या इनिंगमध्ये ६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४ असे एकूण १० बळी घेतले होते. २४ ऑक्टोबरपासून ५ वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 


शार्दुल ठाकूरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्यामुळे आता त्याचा निवडीवर आणि एनसीएच्या रिहॅबिलिटेशनवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुबईमध्ये आशिया कप खेळताना ठाकूरच्या मांडीलाच दुखापत झाली होती. त्यामुळे शार्दुल ठाकूरला परत भारतात पाठवण्यात आलं. १० दिवसानंतर २८ सप्टेंबरला शार्दुल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळवण्यात आलं. यानंतर त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली.


दुसऱ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमीऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. पण चौथ्या ओव्हरच्या चौथ्या बॉललाच शार्दुल ठाकूरच्या मांडीला पुन्हा दुखापत झाली. एकच दुखापत वारंवार होत असेल तर मग शार्दुल ठाकूरला एवढ्या कमी दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे.