अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला धूळ चारण्यात भारत `यशस्वी`, फायनलमध्ये धडक
अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवत फायनलमध्ये धडक मारली आहे.
पॉटचेफस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. पाकिस्तानने ठेवलेल्या १७३ रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने एकही विकेट न गमावता केला. यशस्वी जयस्वालने नाबाद शतक तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद अर्धशतक केलं. यशस्वी जयस्वालने ११३ बॉलमध्ये नाबाद १०५ रन केले. यशस्वी जयस्वालच्या खेळीमध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. दिव्यांश सक्सेनाने ९९ बॉलमध्ये नाबाद ५९ रन केले.
यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांच्यात पहिल्या विकेटसाठी नाबाद १७६ रनची पार्टनरशीप झाली. अंडर-१९ वर्ल्ड कप सेमी फायनलच्या इतिहासातली ही सर्वाधिक रनची ओपनिंग पार्टनरशीप आहे. याचबरोबर यशस्वी जयस्वाल या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. यशस्वी जयस्वालने ५ मॅचमध्ये ३१२ रन केले आहेत. तर दिव्यांश सक्सेनाची या वर्ल्ड कपमधलं हे दुसरं अर्धशतक होतं.
सेमी फायनलच्या या मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलरनी भेदक बॉलिंग करुन पाकिस्तानला वारंवार धक्के दिले. भारताकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिष्णोईला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्थव अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.
पाकिस्तानकडून ओपनर हैदर अलीने ५६ रन तर कर्णधार रोहेल नाझिरने सर्वाधिक ६२ रनची खेळी केली. पाकिस्तानचा ४३.१ ओव्हरमध्ये १७२ रनवर ऑल आऊट झाला. भारताने हे आव्हान ३५.२ ओव्हरमध्येच पूर्ण केलं.
वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडमधली ही मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. या दोघांमधली विजयी टीम भारतासोबत फायनल खेळेल. रविवार ९ फेब्रुवारीला अंडर-१९ वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येणार आहे.