UWW On Wrestlers Protest In India: भारताची राजधानीमध्ये कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest In India) सुरु आहे. या आंदोलनाची देशभरात चर्चा असतानाच आता परदेशातूनही आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना समर्थन मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. जागतिक स्तरावरील कुस्ती संघटना असलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) मंगळवारी जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनातून कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आल्याचा निषेध केला आहे. केवळ निषेधच नाही तर या आंदोलनासंदर्भात इशारा देताना निश्चित वेळेमध्ये कुस्ती महासंघाच्या निवडणुका घेतल्या नाही तर कुस्ती महासंघाला बरखास्त करु असा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूडब्ल्यूडब्ल्यूने भारतीय कुस्ती महासंघाचे विद्यमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे आमचं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील एक पत्रकच यूडब्ल्यूडब्ल्यूने जारी केलं आहे. "मागील अनेक महिन्यांपासून आम्ही भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. भारतामधील कुस्तीपटू कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांकडून होत असलेल्या शोषणाच्या आरोपाविरोधात आंदोलन करत आहेत," असं या पत्रकात म्हटलं आहे. "डब्यूएफआयच्या अध्यक्षांना सुरुवातीलाच या पासून दूर ठेवण्यात आलं आणि आता ते कुस्ती महासंघाचा कारभार पाहत नाहीत," असाही उल्लेख पत्रकात आहे.


तसेच, "मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटना चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. पोलिसांनी कुस्तीपटूंना तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलं आहे. आंदोलनाची जागा बळजबरीने रिकामी करण्यात आली. कुस्तीपटूंना झालेल्या या अटकेचा आम्ही निषेध करतो. तसेच तपास सुरु असल्याचं सांगितलं जात असतानाही त्याचा अहवाल समोर न येणे हे निराशाजनक आहे. संबंधिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करावा अशी आम्ही मागणी करतो," असंही पत्रकात म्हटलं आहे.



आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची सध्याची परिस्थिती आणि सुरक्षेसंदर्भात चर्चा करणार आहोत. त्यांच्या तक्रारींसंदर्भात निष्पक्षपणे तपास होणे आवक्ष्यक आहे. "आयओएन आणि संबंधित समितीच्या बैठकीसंदर्भातील महिती आम्हाला हवी आहे. निवडणूक घेण्यासाठी जास्तीत जास्त 45 धिवसांचा कालावधीची मर्यादा पाळली जावी. जर 45 दिवसांमध्ये कारवाई झाली नाही तर डब्ल्यूएफआयला निलंबित केलं जाईल. त्यामुळे तटस्थ म्हणून स्पर्धांमध्ये कोणत्याही ध्वजाशिवाय सहभागी होतील," असं यूडब्ल्यूडब्ल्यूने म्हटलं आहे. म्हणजेच डब्ल्यूएफआयवर निलंबनाची कारवाई झाली तर कुस्तीपटू भारतीय तिरंग्याऐवजी तटस्थ म्हणजेच कोणत्याच देशाचं प्रतिनिधित्व करत नाही असे खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होतील असा इशारा देण्यात आला आहे.