दुबई : आयसीसीच्या सदस्य देशांमध्ये आणखी एका देशाचा समावेश झाला आहे. अमेरिकेची पुन्हा एकदा आयसीसी सदस्यामध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे अमेरिका हा आयसीसीचा १०५वा देश बनला आहे. आयसीसीनं मंगळवारी रात्री याबद्दलची माहिती दिली. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार 'अमेरिकेनं ९३वा असोसिएट सदस्य बनण्यासाठी अपील केलं होतं. आयसीसीच्या संविधानानुसार याला मंजुरी देण्यात आली. आयसीसीच्या मागच्या सदस्य समिती बैठकीत अमेरिकेला सदस्य बनवण्याची शिफारस करण्यात आली होती'. आयसीसीचे १२ देश हे आधीपासून पूर्ण सदस्य आहेत. आणि ९२ असोसिएट सदस्य होते, त्यामुळे अमेरिका आता आयसीसी सदस्य १०५वा देश बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीचा सदस्य झाल्यामुळे आता अमेरिकेला आयसीसीकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. अमेरिकन क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून विकास फंड नितीच्या अंतगर्त आर्थिक मदत मिळेल. तसंच अमेरिकेत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आयसीसीकडून परवानगी मिळू शकेल. आयसीसी सदस्य देशांमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही अमेरिकेचं अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले.


अमेरिकेत क्रिकेट खेळणाऱ्या समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि खेळाचा विकास करण्यासाठी 'अमेरिका क्रिकेट'ची स्थापना करण्यात आली. अमेरिका आयसीसीचा सदस्य झाल्यामुळे आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पराग मराठे यांनी दिली आहे. अमेरिका आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास १०४ देशांनी व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असं मराठे म्हणाले.


२००४ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अमेरिका


अमेरिका जगातल्या अशा २४ देशांमध्ये सामिल आहे ज्यानी कधी आंतरराष्ट्रीय मॅच खेळली आहे. अमेरिकेनं आत्तापर्यंत २ वनडे मॅच खेळल्या आहेत. २००४ साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अमेरिकेच्या २ मॅच झाल्या होत्या. यातल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये ९ विकेटनं आणि न्यूझीलंडविरुद्ध २१० रननी अमेरिकेचा पराभव झाला होता.