`फक्त एक भ्रष्टाचारी...`, व्यंकटेश प्रसादने Delete केलेलं ट्वीट पुन्हा शेअर केल्याने वादळ; Twitter वर तुफान चर्चा
भारताचा माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसादने ट्विटरला `एक भ्रष्टाचारी माणूस` असा उल्लेख करत केलेलं ट्वीट डिलीट केल्यानंतर पुन्हा एकदा शेअर केलं आहे. व्यंकटेश प्रसादच्या या ट्वीटने सोशल मीडियावर वादळ आणलं आहे.
भारताचा माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आपलं मत मांडताना ते अतिशय परखडपणे मांडतो. कोणतीही तमा न बाळगता व्यंकटेश प्रसाद बेधडकपणे आपलं म्हणणं सांगत असतो. मग तो के एल राहुल असो किंवा मग इतर क्रिकेटर्स असो, व्यंकटेश प्रसाद टीका करताना मागे पुढे पाहत नाही. नुकतंच त्याने आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची घोषणा झाल्यानंतर व्यंकटेश प्रसादने सडेतोड टीका केली आहे. व्यंकटेश प्रसादच्या टीकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, त्याच्या एका ट्वीटने मात्र सोशल मीडियावर वादळच आणलं आहे.
व्यंकटेश प्रसादने हे ट्वीट नंतर डिलीट केलं होतं. माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ लावला जात असल्याचं सांगत त्याने हे ट्वीट काढून टाकलं होतं. पण नंतर भारताच्या या माजी खेळाडूने हे ट्वीट पुन्हा एकदा शेअर केलं. यावेळी त्याने ट्वीटमध्ये काही बदल केले होते.
"एखाद्या प्रामाणिक संस्थेची मेहनत हिरावून घेणं आणि संपूर्ण संस्थेची प्रतिष्ठा खराब करणं यासाठी फक्त एका एखाद्या भ्रष्ट, गर्विष्ठ माणसाची आवश्यकता असते. याचे परिणाम छोटे नाही तर फार मोठ्या प्रमाणावर होतात. प्रत्येक क्षेत्रासाठी ही बाब लागू आहे. मग ते राजकारण, क्रीडा, पत्रकारिता, कॉर्पोरेट कोणतंही क्षेत्र असो,” असं व्यंकटेश प्रसादने आपल्या सुधारित ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
डिलीट केलेल्या ट्वीटमध्ये काय लिहिलं होतं?
सुधारित ट्वीट टाकण्याआधी व्यंकटेश प्रसादने आधीचं ट्वीट डिलीट केलं. त्यात त्याने लिहिलं होतं की, "सामान्यपणे प्रामाणिक संस्थेची मेहनत हिरावून घेण्यासाठी आणि संपूर्ण नेतृत्वावर, केवळ सूक्ष्म पातळीवरच नव्हे तर मोठ्या स्तरावर भ्रष्टाचाराचा शिक्का मारण्यासाठी एका भ्रष्ट, गर्विष्ठ माणसाची गरज असते".
ट्वीट डिलीट का केलं?
एका युजरने व्यंकटेश प्रसादला आधीचं ट्वीट डिलीट का केलं? अशी विचारणा केली. त्यावर व्यंकटेश प्रसादने उत्तर दिलं की "ते एक सामान्य ट्विट होते ज्यामध्ये मी एक भ्रष्ट व्यक्ती कशाप्रकाचे आपल्या संस्थेचे चांगले काम पुसून टाकू शकतो आणि याचा मोठा परिणाण होतो, मग ते कोणतंही क्षेत्र असो याबद्दल बोललो होतो. मी इतर ट्विटमध्ये बीसीसीआयच्या अकार्यक्षमतेबद्दल देखील बोलत असल्याने, यामुळे गोंधळ झाला आणि त्याचा वेगळा संदर्भ लावण्यात आला. म्हणून मी ते ट्वीट डिलीट केले".
व्यंकटेश प्रसादने याआधी बीसीसीआयवर ज्याप्रकारे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांची विक्री केली जात आहे, त्यावरुन टीका केली होती. भारतीय संघातील निवडीचा मुद्दा असो किंवा मग बोर्डातं कामकाज किंवा मग खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी असो, प्रसाद नेहमीच सडेतोड टीका करतो.