`तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही,` ईशान किशन-श्रेयस अय्यर यांना करारातून वगळल्यानंतर स्टार खेळाडूची प्रतिक्रिया
बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार देणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिला आहे. यानंतर वृद्धिमान साहा याने मोठं विधान केलं आहे.
जर एखाद्या खेळाडूला स्थानिक क्रिकेट खेळायचं नसेल तर कोणतीही गोष्ट जबरदस्त करु शकत नाही असं भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने म्हटलं आहे. यावेळी त्याने स्थानिक क्रिकेट हा क्रिकेटचा पाया असून, त्याला महत्व दिलं पाहिजे असंही त्याने सांगितलं आहे. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार देणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिला आहे. बीसीसीआयने त्यांना केंद्रीय करारातून वगळलं आहे. यानंतर वृद्धिमान साहाने हे विधान केलं आहे. यावर भाष्य करताना वृद्धिमान साहाने म्हटलं आहे की, हा बीसीसाआयचा निर्णय, संबंधित खेळाडूंचाही खासगी निर्णय आहे. तुम्ही जबरदस्तीने काही करु शकत नाही.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघात होते. दोन्ही खेळाडू वर्ल्डकप संघाचाही भाग होते. ईशान किशन डिसेंबर महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता. तसंच इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही तो होता. वृद्धिमान साहाने खेळाडूने प्रत्येक सामन्याला तितकंच महत्व दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
"मी जेव्हा कधी फिट असतो तेव्हा मी क्लब सामनेही खेळलो होतो. तसंच ऑफिस सामनेही खेळतो. मी प्रत्येक सामन्याला महत्व देतो. सर्व सामने माझ्यासाठी समान होतो. जर प्रत्येक खेळाडूने असा विचार केला तर त्यांनाच फायदा होईल आणि भारतीय क्रिकेटचंही भविष्य उज्वल होईल," असं वृद्धिमान साहाने म्हटलं आहे.
"स्थानिक क्रिकेटचं महत्व नेहमीच असतं. सरफराज खानने गेल्या 4-5 वर्षात अनेक धावा केल्या आहेत. आताही तो चांगली कामगिरी करत आहे," असं साहाने सांगितलं. साहाने यावेळी ध्रुव जुरेलचं कौतुक केलं. तो अप्रतिम कामगिरी करत असल्याचं साहाने म्हटलं आहे. ध्रुवने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात 46 धावा केल्या. तसंच चौथ्या सामन्यात अनुक्रमे 90 आणि 39 धावा केल्या. या सामन्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
"मी जुरेलला स्थानिक क्रिकेट खेळताना कधीच पाहिलेलं नाही. कसोटी सामन्यातही त्याला फक्त हायलाइटमध्ये पाहिलं आहे. पण तो फार उत्कृष्ट खेळत असून, त्याने संघासाठी सामना जिंकला आहे," असं कौतुक साहाने केलं आहे.
साहाने भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्वल असल्याचं म्हटलं आहे. याचं कारण बेंचवर बसलेले खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. तो म्हणाला की, "आपला रिझर्व्ह बेंचही तयार आहे, हे पाहून चांगलं वाटत आहे. प्रत्येकाला योग्य संधी मिळत आहे," असं साहाने म्हटलं आहे.
"त्यावर, काही खेळाडूंना संधी मिळत आहे, परंतु त्यांना खेळण्याची इच्छा नाही, जे त्यांनी करू नये. जेव्हा जेव्हा तुम्हाला खेळण्याची संधी मिळते तेव्हा तुम्ही प्रत्येक प्रकारात खेळला पाहिजे," असं मत साहाने म्हटलं आहे.