कोलकाता : रजनीश गुरबानीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारत इतिहास रचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भने कर्नाटकविरुद्ध ५ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत विदर्भचा मुकाबला दिल्लीशी होणार आहे. 


कर्नाटककडून एस गोपाल(नाबाद २३) आणि अभिमन्यू मिथुन(३३) यांनी नवव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. 


विजयासाठी १९८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कर्नाटकचा संघ १९२ धावांवर कोसळला. कर्नाटककडून कर्णधार विनय कुमारने ४८ चेंडूंवर पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या.


कर्नाटककडून दुसऱ्या डावात करुण नायरने ४१ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. तर सलामीवीर रवीकुमार समर्थने ६५ चेंडूत दोन चौकाराच्या सहाय्याने २४, जीए गौतमने २४ धावा केल्या.


विदर्भकडून रजनीश गुरबानीने ६८ धावांत सात विकेट घेत कर्नाटकच्या डावाला खिंडार पाडले एसएस नेरळने ३७ धावांत दोन विकेट आणि उमेश यादवने एक बळी मिळवला. याआधी विदर्भने चौथ्या दिवशी चार बाद १९५हून पुढे खेळताना ३१३ धावा केल्या.