ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला. पावसामुळे ही मॅच १७ ओव्हरची करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियानं १७ ओव्हरमध्ये १५८/४ एवढा स्कोअर केला. पण डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताला १७ ओव्हरमध्ये १७४ रनचं आव्हान मिळालं. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं हळू सुरुवात केल्यानंतर क्रिस लिन आणि ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीमुळे १७ ओव्हरमध्ये १५८ रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खराब फिल्डिंग हेदेखील भारताच्या या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर पहिले विराट कोहलीनं आणि मग खलील अहमदनं कॅच सोडला. यामुळे बुमराह मैदानातच भडकलेला पाहायला मिळाला.


पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात हळू होती. पहिल्या ओव्हरमध्ये १ रन केल्यानंतर तिसऱ्या ओव्हरपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर एकही विकेट न गमावता १२ रन होता. पुढच्याच ओव्हरमध्ये विराटनं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचचा कॅच सोडला. त्यावेळी फिंचनं ८ बॉलमध्ये ६ रन केले होते. २४ बॉलमध्ये २७ रन करून फिंच आऊट झाला.



खलीलनंही सोडला कॅच 


यानंतर १७व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर परत एकदा बुमराहच्या बॉलिंगवर खलील अहमदनं थर्डमॅनवर मार्कस स्टॉयनिसचा कॅच सोडला. यानंतर पाऊस सुरु झाला आणि खेळ थांबवण्यात आला. यानंतर मॅचला १७ ओव्हरचं करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमला स्कोअरमध्ये ५ रनच जोडता आल्या. त्यावेळी खलील अहमदनं स्टॉयनिसचा कॅच पकडला असता तर ऑस्ट्रेलियाची आणखी एक विकेट गेली असती आणि डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताला विजयासाठी आणखी कमी रनची गरज पडली असती. 



खलीलनं कॅच सोडला तेव्हा बुमराहला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि तो मैदानातच ओरडला. त्यावेळी स्टॉयनिस १७ बॉलमध्ये ३० रनवर खेळत होता.