मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला मेलबर्नमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर २१५/२ असा आहे. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा ६८ रनवर नाबाद आणि कर्णधार विराट कोहली ४७ रनवर नाबाद आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये वारंवार अपयशी ठरत असलेल्या ओपनर केएल राहुल आणि मुरली विजयला या मॅचमधून डच्चू देण्यात आला. या दोघांऐवजी हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल ओपनिंगला आले. या दोघांनी भारताला ४० रनची सावध सुरुवात करून दिली. पहिल्या १८ ओव्हरमध्ये दोघांनी विकेट गमावली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताला हनुमा विहारीच्या रुपात पहिला धक्का लागला. हनुमा विहारी ८ रन करून आऊट झाला असला तरी त्यानं ६६ बॉल खेळून किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं टाकलेल्या भेदक बाऊन्सरचा हनुमा विहारी शिकार झाला.


१९व्या ओव्हरला पॅट कमिन्सनं टाकलेल्या बाऊन्सरवर खेळण्याचा प्रयत्न हनुमा विहारीनं केला. पण ऑस्ट्रेलियानं फेकलेल्या या जाळ्यामध्ये हनुमा विहारी अडकला. बॉल हनुमा विहारीच्या ग्लोव्हजला लागला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या एरॉन फिंचनं सोपा कॅच पकडला.



१३व्या ओव्हरमध्येही पॅट कमिन्सनं असाच एक बाऊन्सर हनुमा विहारीला टाकला होता. हा बॉल हनुमा विहारीच्या हेल्मेटला लागला. हेल्मेटला बॉल लागल्यानंतर हनुमा विहारीनं एक रनही काढली. यानंतर अंपायरनं विहारीची चौकशी केली आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेनं इशारा केला. अंपायरच्या इशाऱ्यानंतर भारताचा फिजिओ मैदानात आला. पॅट कमिन्सनही विहारीला बॉल लागला नाही ना, याची विचारपूस केली.



मेलबर्नच्या खेळपट्टीवर असलेल्या गवताचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरना उचलता आला नाही. एकीकडे विहारी विकेट वाचवण्यासाठी खेळत होता, तर मयंक अग्रवाल त्याच्या नैसर्गिक खेळ खेळत होता. लंचपर्यंत भारतानं एकच विकेट गमावली होती, पण स्कोअर फक्त ५७ रन होता. मयंक अग्रवाल ७६ रनवर आऊट झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीनं भारताच्या इनिंगला आकार दिला.