जालंधर : भारताचा स्पिनर हरभजन सिंगनं आयपीएलदरम्यान श्रीसंतला थप्पड मारल्यानंतर मोठा वाद झाला होता. पहिल्या आयपीएलदरम्यान झालेल्या या घटनेनंतर हरभजन सिंगवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता पुन्हा एकदा हरभजननं एका व्यक्तीच्या कानाखाली मारली आहे. कुस्तीच्या रिंगणामध्ये हरभजननं पोलिसाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीच्या श्रीमुखात लगावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंग हा मागच्या आठवड्यामध्ये WWE मधला कुस्तीपटू द ग्रेट खलीच्या जालंधरमधल्या अॅकेडमीमध्ये गेला होता. या अॅकेडमीमध्ये रिंगणात असताना हरभजनला मारायला पोलिसाच्या वेशातील एक व्यक्ती आली. या व्यक्तीचा फटका हरभजननं चुकवला आणि उलट त्याच्यावरच आक्रमण केलं. हरभजननं पोलिसाच्या वेशात आलेल्या या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. हरभजनच्या फटक्यानं ही व्यक्ती जागीच कोसळली आणि रिंगणाच्या बाहेर फेकली गेली. 



रिंगणाच्या बाहेर फेकलं गेल्यानंतर या व्यक्तीचा राग अनावर झाला आणि त्यानं हरभजनकडे बघून इशारे करायला सुरुवात केली. अखेर या व्यक्तीनं तिथून पळ काढला. हरभजननंही यानंतर त्याच्या हातात असलेला माईक रिंगणामध्ये फेकून दिला. तिकडे जमलेल्या प्रेक्षकांनी 'भज्जी-भज्जी' अशा घोषणाही दिल्या. हरभजननं हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.