आयपीएल किंवा क्रिकेटच्या एखाद्या सामन्यामध्ये, एखाद्या टेनिस सामन्यामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेदरम्यान, जाहीररित्या आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला प्रपोज करत आश्चर्याचा धक्का देण्याची बाब आता नवी राहिली नाही. सोशल मीडियावर यासंदर्भातल्या असंख्य व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हा व्हिडीओ (बीबीएल) अर्था बिग बॅश लीगमधील असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground) मध्ये पार पडलेल्या एका सामन्यात खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा झाली ती म्हणजे तिथं घडलेल्या एका कमाल प्रसंगाची. कारण, इथं एका पठ्ठ्यानं त्याच्या प्रेयसीला इतक्या प्रेक्षकांसमोर प्रपोज केलं होतं. बरं, गंमत तर पुढे होती कारण ही दोघं सामना पाहायला एकत्र आली असली तरीही त्यांचा पाठींबा मात्र दोन वेगळ्या संघांना होता. 


सामाना सुरु असतानाच माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या नात्याची ही हटके बाजू सर्वांसमोर आली, जिथं मुलीनं रेनेगेड्स आणि मुलानं स्टार्स या संघांना पाठींबा देत असल्याचं सांगितलं. या दोघांनाही जोडणारा दुवा ठरला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल. कारण, तो या दोघांचाही आवडता. 


एकमेकांबद्दलची ही माहिती दिल्यानंतर तरुणानं त्याच्या प्रेयसीपुढं गुडघे टेकत तिच्या हातात अंगठी घातली. बस्स... मग काय? तिथं असणाऱ्या चाहत्यांनीही ही प्रेमाची गोष्ट पाहून एकच कल्ला करण्यास सुरुवात केली. भर मैदानात कोणतीही कल्पना नसताना त्याचं असं व्यक्त होणं तिला भारावून टाकणारं होतं. तिचा चेहरा आणि त्यावर असणारे भाव हेच अगदी स्पष्टपणे सांगत होते. 


 7Cricket च्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओचं वेगळेपण इतकं की, शेकड्यानं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला आणि तो रिशेअरही केला. ज्यामुळं त्यावर असंख्य कमेंट्स आणि Like रिअॅक्शन्स आले. प्रेमाच्या नात्याचा असा कोणता व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?




राहिला मुद्दा सामन्या तर...  


सामन्याविषयी सांगावं तर, पावसामुळे 14 षटकांत खेळल्या गेलेल्या सामन्यात स्टार्स संघानं रेनेगेड्सचा सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रेनेगेड्स संघाला केवळ 97 धावा करता आल्या. मेलबर्न स्टार्सच्या 6 गोलंदाजांनी विकेट घेतल्या. हे आव्हान पेलत स्टार्सने 13व्या षटकात दोन गडी राखून लक्ष्य गाठले. सलामीवीर थॉमस रॉजर्सने 34 चेंडूंत 6 चौकारांसह 42 धावांची जलद खेळी खेळली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 15 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. गोलंदाजीतही मॅक्सवेलने 3 षटकांत केवळ 8 धावा देऊन एक बळी घेतला आणि या जोडीचा आवडता मॅक्सवेलच या सामन्याचा सामनावीर ठरला.