VIDEO: भारताच्या जलद माऱ्यापुढे कांगारू घायाळ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या फास्ट बॉलरनी भेदक बॉलिंग केली.
पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या फास्ट बॉलरनी भेदक बॉलिंग केली. भारताच्या बॉलरनी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनपुढे कडवं आव्हान उभं केलं. पर्थच्या हिरव्यागार आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीचा भारताच्या बॉलरनी पुरेपुर फायदा घेतला. आखूड टप्प्याचे बॉल टाकून भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांचंच औषध दिलं. या सगळ्यामध्ये एरॉन फिंच जखमी झाला. याचबरोबर मार्कस हॅरिसच्या हेल्मेटला बॉल लागला आणि उस्मान ख्वाजालाही दुखापत झाली.
दुखापतीमुळे एरॉन फिंच रिटायर्ड हर्ट
भारताच्या फास्ट बॉलरनी दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी लागोपाठ बाऊन्सर आणि शॉर्टपीच बॉल टाकले. १३व्या ओव्हरचा मोहम्मद शमीचा असाच एक बॉल एरॉन फिंचच्या हाताला लागला. यानंतर एरॉन फिंच मैदानात कळवळला आणि रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये गेला. बोटाला दुखापत झाल्यामुळे फिंचला एक्सरे काढण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. गरज पडली तर फिंच पुन्हा एकदा बॅटिंगला येऊ शकतो.
बुमराहचा बॉल हॅरिसच्या हेल्मेटला लागला
फिंच दुखापतग्रस्त होण्याच्या आधी मार्कस हॅरिसच्या हेल्मेटलाही बॉल लागला. आठव्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहनं टाकलेला बॉल हॅरिसच्या हेल्मेटला जाऊन आदळला. यानंतर लगेचच मेडिकल टीम मैदानात आली, पण हॅरिसला दुखापत झाली नसल्याचं निष्पन्न झालं.
उस्मान ख्वाजालाही दुखापत
मोहम्मद शमी लागोपाठ शॉर्टपीच बॉलिंग करून ऑस्ट्रेलियाची परीक्षा बघत होता. यामध्येच उस्मान ख्वाजाच्या बोटांनाही बॉल लागला. हॅरिसप्रमाणेच ख्वाजालाही दुखापत झाली नसल्याचं समोर आलं.
अशी बॉलिंग बघितली नाही- गावसकर
शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकॉम्ब आणि ट्रेव्हिस हेड या खेळाडूंनाही भारताच्या फास्ट बॉलरना खेळताना अडचणी निर्माण होत होत्या. भारतीय बॉलरनी १४० किमी प्रती तासापेक्षा जास्त वेगानं बॉलिंग केली. भारतीय बॉलरकडून मी अशी भेदक बॉलिंग पहिल्यांदाच बघत आहे, अशी प्रतिक्रिया कॉमेंट्री करत असलेल्या सुनील गावसकर यांनी दिली. जवागल श्रीनाथ आणि एस.श्रीसंत यांना मी अशी बॉलिंग करताना पाहिलं होतं, पण सगळेच फास्ट बॉलर एकमेकांना मात देत असल्याचं मी पहिल्यांदाच बघितलं, असं गावसकर म्हणाले.