ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली वनडे सीरिज रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. सिडनीमध्ये पहिली वनडे गमावल्यानंतर भारतानं ऍडलेडमध्ये शानदार कामगिरी करुन सीरिजमध्ये पुनरागमन केलं. या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटनं विजय झाला. या विजयामुळे आता सीरिज १-१नं बरोबरीत आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या या मॅचमध्ये धोनीनं खास त्याच्याच अंदाजात भारताला विजय मिळवून दिला. पण या मॅचमध्ये धोनीनं केलेली एक चूक कोणाच्याच अगदी अंपायरच्याही लक्षात आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४५ व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या बॉलिंगवर धोनीनं एक रन शॉर्ट घेतली. या ओव्हरआधी भारताला विजयासाठी ३६ बॉलमध्ये ५५ रनची गरज होती. यानंतर धोनीनं ५ बॉलमध्ये १ सिक्ससह १० रन केले. आता भारताला विजयासाठी ३१ बॉलमध्ये ४४ रनची गरज होती. तेव्हा शेवटचा बॉल धोनीनं लॉन्ग ऑनच्या दिशेनं खेळला. यानंतर धोनी आरामात रन घेताना दिसला, पण त्यानं क्रिजमध्ये बॅट टेकवलीच नाही. ओव्हर संपल्यामुळे धोनी कार्तिकशी बोलायला गेला. त्यामुळे धोनीनं रन पूर्ण केली नाही.


ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचंही या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्टम्पवर बॉल मारला असता, तर धोनीला रन आऊट होऊन परत पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं असतं.



या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं सिक्स मारून भारताला ४ बॉल राखून विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये धोनीनं ५४ बॉलमध्ये ५५ रनची खेळी केली. तर विराट कोहलीनं त्याचं वनडे क्रिकेटमधलं ३९वं शतक झळकावलं. ११२ बॉलमध्ये १०४ रन करून विराट आऊट झाला. दिनेश कार्तिकनंही १४ बॉलमध्ये २५ रन करून भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं.


मेलबर्नमध्ये होणार तिसरी वनडे


या सीरिजची शेवटची म्हणजेच तिसरी वनडे शुक्रवार १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये होणार आहे. सध्या ही वनडे सीरिज १-१नं बरोबरीत आहे, त्यामुळे तिसरी वनडे निर्णायक ठरणार आहे. याआधी भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये २०१६ साली वनडे सीरिज खेळली होती. त्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला होता. मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात १४ मॅच झाल्या आहेत. यातल्या ५ मॅचमध्ये भारताचा तर ९ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे.