मुंबई : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला. बॉल लागल्यामुळे शोएब मलिक मैदानातच बेशुद्ध पडला. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये पाकिस्तानची टीम पहिले बॅटिंगला आली. पण त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या तीन विकेट गेल्यानंतर फकर जमा आणि हॅरिस सोहीलनं अर्धशतकं करून पाकिस्तानचा डाव सावरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ व्या ओव्हरला सोहेल आऊट झाल्यानंतर शोएब मलिक बॅटिंगला आला. बॅटिंगला येताना शोएब मलिक हेल्मेटशिवायच मैदानात आला. ३२ व्या ओव्हरला न्यूझीलंडचा स्पिनर सँटनर बॉलिंग करत असताना शोएब मलिकनं एक रन घ्यायचा प्रयत्न केला, पण कॉलीन मुनरोनं बॉल थ्रो केला आणि हा बॉल शोएब मलिकच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला. शोएब मलिकच्या डोक्याला लागून बॉल बाऊंड्रीच्या बाहेर गेला पण मलिक मैदानातच पडला.


डोक्याला बॉल लागल्यावर शोएब मलिक खूप वेळापर्यंत मैदानातच पडून राहिला. यानंतर शोएब मलिकनं बॅटिंगला सुरुवात केल्यानंतर मलिक लगेचच आऊट झाला. पण पाकिस्तानच्या बॉलिंगवेळी मलिक मैदानात उतरलाच नाही. शोएब मलिकच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


या मॅचमध्ये कॉलीन डि ग्रांडहोमच्या आक्रमक खेळीनं न्यूझीलंडनं पाकिस्तानचा पराभव केला. ग्रांडहोमनं ४० बॉल्समध्ये नाबाद ७४ रन्सची खेळी केल्यामुळे न्यूझीलंडनं २६३ रन्सचं आव्हान सहज पार केलं. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं पाच मॅचच्या सीरिजमध्ये ४-०नं आघाडी घेतली आहे. याचबरोबर न्यूझीलंडनं लागोपाठ ११ मॅच जिंकण्याचं रेकॉर्डही केलं आहे.


मागच्या मॅचमध्ये फक्त ७४ रन्सवर ऑल आऊट झालेल्या पाकिस्ताननं या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. एका वेळी पाकिस्तानच्या दोन विकेट फक्त ११ रन्सवर गेल्या होत्या. पण मोहम्मद हाफीजच्या ८१ रन्सच्या खेळीमुळे पाकिस्ताननं सन्मानपूर्व रन्स बनवल्या.


असा लागला शोएब मलिकला बॉल