Video: ऋषभ पंतशी पॅट कमिन्स मैदानातच भिडला
चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी २५०/९ एवढा स्कोअर केला आहे.
ऍडलेड : चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी २५०/९ एवढा स्कोअर केला आहे. चेतेश्वर पुजारा १२३ रन करून आऊट झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मोहम्मद शमी नाबाद ६ रनवर खेळत आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात फारच निराशाजनक झाली. १०० रन होण्याआधीच भारताच्या ५ विकेट गेल्या होत्या. चेतेश्वर पुजाराशिवाय रोहित शर्मानं ३७, ऋषभ पंत आणि आर.अश्विननं प्रत्येकी २५-२५ रन केले.
या मॅचमध्ये भारताची सुरुवात खराब झाली होती. लंच ब्रेकपर्यंत भारताचा स्कोअर ५६/४ विकेट एवढा होता. मैदानात पुजाराबरोबर विकेट कीपर ऋषभ पंत होता. यावेळी पॅट कमिन्सनं ऋषभ पंतवर शाब्दिक हल्ला केला. ऋषभ पंत ३८ बॉलमध्ये २५ रन खेळून आऊट झाला. नॅथन लायननं पंतची विकेट घेतली. पंत जोपर्यंत मैदानात होत तोपर्यंत तो आक्रमक क्रिकेट खेळत होता. भारताच्या कमी स्कोअरवर सुरुवातीच्या विकेट गेल्यानंतरही पंत शॉट मारत होता, हे कदाचित कमिन्सला पटलं नसावं.
ऋषभ पंतनं पॅट कमिन्सच्या एका बॉलवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटला बॉल लागला नाही. यानंतर कमिन्स पंतजवळ गेला आणि त्याला काहीतरी बोलला. पंतनं मात्र कमिन्सला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तो दुसरीकडे वळला.
पॅट कमिन्सनं निशाणा साधल्यानंतर नॅथन लायनच्या बॉलिंगवर विकेट कीपर टीम पेननं पंतचा कॅच पकडला. भारताची अवस्था बिकट असताना सावध खेळ करायचा सोडून पंतनं केलेल्या फटकेबाजीवर सोशल नेटवर्किंगवर टीका करण्यात आली.
या मॅचमध्ये भारताची अवस्था एकावेळी ४ आऊट ४१ रन अशी होती. पण पुजारानं रोहित शर्मा(३७ रन), ऋषभ पंत(२५ रन) आणि अश्विन (२५ रन) यांच्या मदतीनं भारताला बिकट परिस्थितीमधून बाहेर काढलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूड, पॅट कमिन्स, नॅथन लायननं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.