अध्यक्षपदाच्या खूर्चीवर बसल्यानंतर गांगुली कोहली-धोनीविषयी म्हणतो...
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. अध्यक्षपदाच्या खूर्चीवर बसल्यानंतर गांगुलीने पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी आपण गुरुवारी बोलणार आहोत. विराट कर्णधार आहे, भारतीय क्रिकेटसाठी विराट खूप खास आहे. आम्ही त्याला पूर्ण मदत करु, असं वक्तव्य गांगुलीने केलं आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये गांगुलीने धोनीच्या भवितव्याबाबतही विधान केलं आहे. धोनीने त्याच्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली. धोनीने केलेल्या विक्रमांची यादी बघितली, तर महान खेळाडू एवढ्या लवकर संपत नाहीत, हे लक्षात येईल. मी आहे तोपर्यंत सगळ्यांचा योग्य मान राखला जाईल, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.
आमच्यासाठी हे काम आव्हानात्मक आहे. आमची टीम तरुण आहे. पहिले आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. मागच्या ३-४ वर्षात काय झालं? ते आम्हाला माहिती नाही, कारण वार्षिक सभाच झाली नाही. आम्ही भारतीय क्रिकेटला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करू, असं आश्वासन गांगुलीने दिलं.
परस्पर हितसंबंधांचा मुद्दाही बदलण्याची गरज असल्याचं मत गांगुलीने व्यक्त केलं आहे. प्रशासकीय समितीने यावर काम केलं आहे. त्यांनी हे प्रकरण आधी सर्वोच्च न्यायालयात ठेवलं. आता यामध्ये कसे बदल होतात ते पाहावं लागेल, असं गांगुली म्हणाला.
माझी प्राथमिकता स्थानिक क्रिकेटकडे लक्ष देणं असेल. रणजी क्रिकेट माझ्यासाठी प्राथमिकता आहे, कारण याच क्रिकेटमधून आपल्याला धोनी आणि कोहली मिळाले आहेत, असं गांगुलीने सांगितलं.