Vinesh Phogat Disqualified PM Modi First Comment: भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन अधिक असल्याने अपात्र ठरवण्यात आलं आहे. आवश्यक मर्यादेपेक्षा केवळ 100 ग्राम वजन अधिक असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आहे. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मोदींनी घडलेल्या घटनेमुळे धक्का बसला असल्याचं आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, "विनेश तू चॅम्पियन्समधील चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस. तू प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली आहेस," असं म्हणतं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. "आज घडलेली घटना फार वेदनादायक आहे. मला जे काही वाटत आहे ते शब्दात मांडता आलं असतं तर बरं झालं असतं. त्याचवेळी मला तू यामधून बाहेर येण्याची क्षमता ठेवतेस याची कल्पना आहे," असंही मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना पंतप्रधानांनी विनेशला धीर देत पुन्हा दमदार पुनरागमन करशील असा विश्वास व्यक्त केला आहे. "तू कायमच समोर आलेल्या आव्हांनाना तोंड दिलं आहे. तू यामधून अधिक भक्कमपणे पुनरागमन करशील. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत," असं मोदींनी म्हटलं आहे.



पी.टी. उषा यांच्याशी मोदींचं झालं बोलणं


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मोदींनी पी.टी. उषा यांच्याकडून सदर विषयावर माहिती जाणून घेतली. तसेच या प्रकरणानंतर पुन्हा दाद मागण्यासाठी भारताकडे नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत यासंदर्भात मोदींनी पी.टी. उषा यांच्याकडून माहिती घेतली. तसेच पी.टी. उषाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत. विनेशला मदत होत असेल तर भारताकडून तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवाला जावा असंही, मोदींनी पी.टी. उषा यांनी सुचवल्याचं समजतं.


दरम्यान, या विषयावरुन संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला असून दुपारी 3 वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री निवेदन सादर करणार आहेत.