मुंबई : शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली. रविवारी चेन्नईने आयपीएलच्या ११व्या हंगामात अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला होता. धोनी आणि त्याच्या टीमने पुन्हा एकदा दाखवून दिले की वय खेळाच्या आड येत नाही. तुमच्याकडे अनुभव आणि फिटनेस असेल तर तुम्ही कोणतेही युद्ध जिंकू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांनी जी कामगिरी केली ते पाहता असे वाटत होते की चेन्नईसाठी हा सामना जिंकणे कठीण आहे. मात्र ३६ वर्षीय शेन वॉटसनने एकट्याने किल्ला लढवताना हैदराबादच्या गोलंदाजीला फोडून काढले. चेन्नईने १७९ धावांचे लक्ष्य १८.३ षटकातच पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईने केवळ दोन विकेट गमावल्या.


फायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा धोनीचा मजामस्तीचा अंदाज पाहायला मिळाला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात सामन्यानंतर धोनी आणि ड्वायेन ब्रावो बॅट हातात घेऊन धावताना दिसतोय. विकेट्स दरम्यान दोघांच्या हातात बॅट होती आणि दोघांना तीन धावा घ्यायच्या होत्या.