मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीला आशिया कपसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यावरून बीसीसीआय आणि आशिया क्रिकेट परिषद (एसीसी) यांच्यामध्ये वाद झाला आहे. आशिया कपचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सनं विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. याला बीसीसीआयनंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मॅच प्रसारण करणारे भारतीय टीम निवडीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला इंग्लंडच्या 84 दिवसांच्या दौऱ्यानंतर आराम देण्यात आला. इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटनं 593 रन केले. टेस्ट सीरिजमध्ये विराट सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.


मॅचचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सनं एसीसीचे खेळ विकास प्रबंधक तुसीथ परेरा यांना एक ईमेल पाठवला आहे. या मेलमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आशिया कपमध्ये जगातल्या सर्वोत्तम बॅट्समन नसण्याची घोषणा स्पर्धेच्या 15 दिवस आधी करणं आमच्यासाठी मोठा झटका आहे. यामुळे आमच्या महसूल आणि आर्थिक लाभावर परिणाम होईल, असं या मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे.


विराटला विश्रांती दिल्याबद्दल एसीसीनं बीसीसीआयला संपर्क करायला सांगितला. मीडिया अधिकार करार (एमआरए) अंतर्गत सर्वोत्तम टीम स्पर्धेत भाग घेतील हे एसीसीला निश्चित करावं लागतं.


राष्ट्रीय टीमची निवड देशाच्या संस्थेच्या अधिकार क्षेत्रात येतं. कोणत्याही बाहेरच्या संस्थेला किंवा व्यक्तीला यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी परेरा यांना उत्तर दिलं आहे. स्पर्धेसाठी सर्वोत्तम टीमची निवड करणं बीसीसीआयचा विशेषाधिकार आहे. एसीसी किंवा प्रसारण करणारं चॅनल खेळाडूंच्या निवडीसाठी दबाव टाकू शकत नाही. तसंच कोणती टीम कोणत्या स्पर्धेसाठी सर्वोत्म आहे यावर प्रश्नही उपस्थित करू शकत नाही, असं राहुल जौहरी यांनी एसीसीला सांगितलं.