पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये जोरदार मुकाबला सुरु आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननं विजय झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं शानदार पुनरागमन केलं. बॅट आणि बॉलबरोबरच्या सामन्याबरोबरच पर्थच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळाडूंच्या शाब्दिक चकमकी होतानाही दिसत आहेत. या टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन मैदानात भिडले. यानंतर अंपायर क्रिस गफाने यांनी दोन्ही खेळाडूंना इशारा दिला. भारताच्या बॉलिंगवेळी ७१व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर या दोन कर्णधारांमध्ये बाचाबाची झाली. ही बाचाबाची सुरु असताना गफाने यांनी हस्तक्षेप केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा काल पराभव झाला होता. तू आज शांत बनण्याचा प्रयत्न का करत आहेस? असा सवाल विराटनं टीम पेनला विचारला. त्यावेळी अंपायर क्रिस गफाने मध्ये पडले आणि म्हणाले ''आता बस झालं, चला खेळायला सुरुवात करा. तुम्ही कर्णधार आहात. टीम तू कर्णधार आहेस''


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननंही याचं प्रत्युत्तर दिलं. आम्ही फक्त गप्पा मारत आहोत. आम्ही कोणताही अपशब्द वापरला नाही. विराट स्वत:ला शांत ठेव, असं टीम पेन म्हणाला.


कोहली यानंतर काय म्हणाला ते मायक्रोफोनमधून ऐकू आलं नाही. काहीवेळानंतर हे दोघं एकमेकांच्या छातीला छाती लावणार होते. टीम पेन रन पूर्ण करत असताना कोहली त्याच्या समोर आला. यानंतर विराट कोहलीनं स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या अंपायर कुमार धर्मसेना यांच्यासमोर स्वत:ची बाजू मांडली.



कोहलीच्या वर्तनावर आक्षेप


विराट कोहलीच्या वर्तनावर डॅमियन फ्लेमिंग आणि संजय मांजरेकर यांनी आक्षेप घेतला. विराट कोहलीचं धैर्य सुटत असल्याचे हे संकेत असल्याचं फ्लेमिंग म्हणाला. तर मांजरेकरही कोहलीच्या वर्तनामुळे नाराज झाले. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांना मात्र शाब्दिक चकमकीत काहीच गैर वाटलं नाही. जोपर्यंत तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडत नाही तोपर्यंत यात काहीच चुकीचं नसल्याचं पाँटिंग आणि क्लार्क म्हणाले.


'खेळ भावनेला धरूनच'


विराट आणि पेनमध्ये झालेली शाब्दिक चकमक खेळ भावनेला धरूनच होती. खेळ भावनेचं कुठेही उल्लंघन झालेलं नाही. हे सगळं हलक्या फुलक्या वातावरणात केलं गेल्याचं ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जॉस हेजलवूड म्हणाला. मैदानात तगडी स्पर्धा सुरु असल्यामुळे शब्दांची देवाण-घेवाण होणार, पण याला जास्त महत्त्व देता कामा नये, असं मत हेजलवूडनं व्यक्त केलं.